कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्याचे भान काही मंडळींना नाही. कल्याण पूर्व भागात लग्नसोहळा आयोजित करून ७०० जणांची गर्दी जमविल्याची घटना ताजी असताना डोंबिवलीतील तरुणाने एक प्रताप केला आहे. कोरोना नियमावलीचे उल्लंघन करून त्याने चक्क त्याच्या बैलाचा वाढदिवस साजरा करून गर्दी जमविली. याप्रकरणी संबंधित तरुणाविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव ठाकुर्ली परिसरातील गोवर्धन इमारतीच्या समोर राहणारे किरण एकनाथ म्हात्रे यांनी कोरोना नियमावलीचे पालन न करता आपल्या बैलाचा वाढदिवस साजरा केला. त्यासाठी त्यांनी रात्री १२ वाजता मोठ्या आवाजात डीजे लावून मोठी गर्दी जमविली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही, तसेच त्यांच्या तोंडावर मास्कही नव्हता. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पुढाकार घेऊन कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी किरण म्हात्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आधी लग्नसाेहळा आणि आता बैलाचा वाढदिवस या घटनांवरून कल्याण डोंबिवलीतील वाढत्या रुग्णसंख्येविषयी नागरिकांमध्ये गांभीर्य नाही. महापालिका आयुक्तांनी गुरुवारपासून कोरोनाचे निर्बंध लागू केलेले आहेत. मात्र, या निर्बंधांना धाब्यावर बसविण्याचे काम काही मंडळींकडून होत आहे. त्यातून रुग्णसंख्या आणखी वाढू शकते. महापालिकेने कोरोनाचे २८ हॉटस्पॉट जाहीर केले आहेत. त्यापैकी बहुतांश हॉटस्पॉट हे डोंबिवली शहरातील आहेत. याचेही गांभीर्य काही मंडळींना नाही.
फोटो-कल्याण-बैल
-----------------