ठाणे : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारी ‘होळी’ यंदा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करून राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे.
कोविडच्या अनुषंगाने यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षी २८ व २९ मार्च रोजी चा ‘होळी उत्सव’ अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचनादेखील जाहीर केल्या आहेत. यामध्ये होळीचा सण साजरा करताना मोठ्या प्रमाणात जागोजागी होळी पेटवण्यात येत असते. लाकडे जाळणे तसेच यामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाचा विचार करता होळी पेटवण्यात येऊ नये. धूलिवंदनाच्या दिवशी रंगांचा वापर न करता पाण्याचा अपव्यय टाळावा, सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही, अशा धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमांचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करू नये, असे आवाहन केले आहे.
शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांशविरुद्ध यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६०, साथरोग नियंत्रण अधिनियम, १८ ९ ७ व भारतीय दंडसंहिता, १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.