मीरा रोड : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस निमित्ताने भाईंदर येथील खाडी किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. शासनाच्या कांदळवन विभाग व जागरूक नागरिकांच्या माध्यमातून भाईंदर पूर्वेच्या खाडीकिनारी आरएनपी पार्क कोळीवाडा येथे रविवारी ही मोहीम राबविण्यात आली.
कांदळवन विभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर म्हस्के, कांदळवन फाऊंडेशनच्या सुचित्रा पालये व चैताली पाटील, फॉर फ्युचर इंडियाचे हर्षद ढगे व सहकारी, चाईल्ड हेल्प फाऊंडेशन, खेलो मीरा भाईंदर खेलो, लियो क्लब आदी संस्थांच्या स्वयंसेवकांसह स्थानिक रहिवासी व मच्छीमार यांनी किनारपट्टी व कांदळवनमधील मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा काढला. कांदळवन व किनारा स्वच्छ ठेऊन पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प यावेळी तरुणाईने केला. महापालिकेने कांदळवन व खाडी - समुद्रातील कचऱ्याची नियमित साफसफाई करण्यासह कचरा, मलबा टाकण्यास प्रतिबंध करून कारवाई करण्याची मागणी स्वच्छतादुतांनी केली.