उल्हासनगर : मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी महापालिका सभागृहात पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी पत्रकार समाजाचा नव्हेतर आमचा दिशादर्शक व मार्गदर्शक असल्याचे मत आयुक्त शेख यांनी व्यक्त केले.
उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती झाल्यानंतर, अजीज शेख यांनी पारदर्शक कारभार सुरू केला. पत्रकारांना बातमीसाठी लागणारी माहिती अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता द्यावी. असा फतवा त्यांनी यापूर्वीच काढला. जोपर्यंत बातमीत महापालिकेची बाजू येणार नाही. तोपर्यंत बातमी परिपूर्ण होऊ शकत नाही. असे अधिकाऱ्यांना सांगून पत्रकारांना सहकार्य करण्याचे आयुक्तांनी सांगितले. ६ जानेवारीला मराठी पत्रकार दिना निमित्त महापालिका सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, डॉ सुभाष जाधव, प्रियंका राजपुत, लेखा शाखेचे शरद देशमुख व किरण भिलारे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय राजगुरू व पत्रकार सोनल बशिरे आदीजन उपस्थित होते.
यावेळी किरण सोनावणे, दिलीप मालवणकर, रवींद्र धांडे व प्रफुल केदारे यांनी आपले मत व्यक्त केले. आयुक्त व प्रशासक अजीज शेख यांनी पत्रकार व महापालिका प्रशासनाने सामंजस्याने व समन्वयाने काम केलेतर, शहराचा विकास होण्यास हातभार लागुन समस्यांचे निराकरण करता येईल, असे मत व्यक्त केले. तसेच पत्रकार दिशादर्शक व मार्गदर्शकाचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या चुका दाखवुन देण्याबरोबर चांगल्या कामांचीही दखल घेतली पाहिजे. आम्हीही माणसं आहोत, त्यामुळे चुकणे हा आमचाही अधिकार आहे, असे मार्मिक वक्तव्य आयुक्तांनी केले. जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.