ठाणे : ब्रह्मांड कट्टा अंतर्गत ब्रह्मांड कलासंस्कार या संस्थेने रविवारी सहयाेग मंदिर, घंटाळी ठाणे येथे शिल्पकला, तालवाद्य, नृत्य, चित्रकला व गायनाचा अविष्कार पेश करुन संलग चौथ्या वर्षी ठाण्यात "जागतिक कला दिन" विविध टप्प्यात साजरा केला.
ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव, कवियित्री सुहासिनी भालेराव. महेश जोशी, चारुदत्त नायगावकर, शैलेश वैद्य यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचा श्रीगणेशा चेतना भास्कर यांच्या कला सृष्टि अकडमीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदनेवर उत्कृष्ट नृत्य सादर करुन केले. त्या नंतर कलासंस्कारच्या सदस्या प्राजक्ता जोशी यांनी फार सुंदररित्य बाहुबली मधील क्लासिकल तत्वावर आंनदी तांडव नृत्य सादर केले व प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचे आकर्षण ठरले ते पंडीत चारूदत्त नायगांवकर यांच्या सतार वादनाचा कार्यक्रम त्यांनी पहिल्या पासूनच रसिकांच्या मनाचा ताबा घेतला. सर्वप्रथम त्यांनी राग हेमवती वर आधारित एक बंदिशींची झलक दाखविली. नंतर सतारीवर त्यांनी "आज आज सोचा तो आसू भर आये", नैनोमें बदरा छाये या मदन मोहन यांच्या गीतांच्या धुंन वाजवून बहार उडवली. पुढे राग यमन वर आधारित काही हिंदी फिल्मी गीतांची मेडली पेश केली व रसिकांच्या मनावर गारुड केले. त्यात आज जानेकी जिद ना करो, जारे बदरा बैरी जा, तोच चंद्रमा नभात, चंदन सा बदन, एहसान तेरा होगा मुझपर व जब दिप जले आना आदि गाणी पेश करुन रसिकांना देहभान विसरायला लावले. सूत्र संचालिका वर्षा गंद्रे यांच्या प्रश्नांना उत्तर देतांना नायगांवकरांनी कलावती रागाचा उपयोग विररस उत्पन्न करण्यासाठी कसा होतो हे " कोई सागर दिलको बहलाता नही" हे गाणं सादर करुन दिले. नायगावकरांनी "दिवाना हुआ बादल" या ओपींच्या गाण्याने सतारी वरील मैफलीची सांगता केली. जागतिक कला दिन कार्यक्रमाचा तिसरा टप्पा पुन्हा कला संस्कारच्या सदस्या सुप्रिया ऐतुलवार हिने ईशा फाऊंडेशन सदगुरु यांचा रैली फोर रीवर्स या प्रोजेक्टच्या टाइटल गीतावर नृत्य सादर केले तर रुचिरा मोकळ हीने काहे छेडे नंदलाल या गीतावर फ्यूजन करुन रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सहयोग मंदिरात एका बाजूला शिल्पकार शैलेष वैद्य यांचे सुदंर शिल्प आकार घेत होते तर दुसऱ्या बाजूला सोनल आर्ट स्टुडियोचे चित्रकला प्रदर्शन सुरु होते तर ठाण्यातील वनवासी मुलांनी बनविलेल्या इको फ्रेंडली पिशव्या विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात कनिरा आर्टस प्रस्तुत "कलेचा गगन झुला" या मराठी सेमी क्लासिकल गीतांची मैफल वृषाली घाणेकर व प्रसिद्ध गायक नितीन श्री यांनी सादर करुन श्रोत्यांना भावगीतांच्या जगात घेऊन जाण्याची किमया केली. एकापेक्षा एक सुरेल व सुरेख भावगीते सादर करुन प्रेक्षकांना तृप्त केले. धुंदी कळ्यांना, जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, शुक्र तारा, मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, स्वप्नातील कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा अशी अवीट गोडीची भावगीतं सादर करुन प्रेक्षकांना जखडून टाकले. देहभान हरपायला लावले. इडली चटणी शिवाय चांगली लागत नाही तसच ही गाणी रसिकांच्या मनांत उतरवण्यासाठी नेहाताई पेडणेकर यांचं तितक्याच तोलामोलाच निवेदन या भावगीतांच्या कार्यक्रमाला लाभलं होतं. गायिका वृषाली घाणेकरच्या माघाची थंडी माघाची या लावणीवर तर माधुरी गद्रे या ७५ वर्षाच्या आजींनी न थकता ताल धरला व एकच बहार उडवून दिली प्रेक्षक थक्क झाले. महीलांसाठी सेमी पैठणीचा लकी ड्रॉ मुलूंडच्या रिध्दी सिध्दी या दुकानाच्या वतीने ठेवण्यात आला होता यामध्ये कळव्याच्या सुवर्णा मानकामे या लकी ड्राच्या मानकरी ठरल्या. मान्यवरांचे यथोचित आभार कलासंस्कारच्या अध्यक्षा वर्षा गंद्रे यांनी मानून कार्यक्रम समाप्तीची घोषणा झाली व रसिक वृषाली व नितीनचे स्वर मनात साठवत घराकडे रवाना झाले. कार्यक्रमासाठी आमदार संजय केळकर, ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव, अध्यक्ष महेश जोशी, कवयित्री सुहासिनी भालेराव अनुलोमचे सहकारी यांची उपस्थिति लाभली तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुगंधा इंद्रजीत, अरुण दळवी अरविंद विंचूरे य, देवेंद्र गंद्रे सोनाली काळे कुलकर्णी यांनी मेहनत घेतली.