ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळाचा १९ वा “वर्धापन दिन” रविवारी सकाळी सहयोग मंदिर सभागृह, घंटाळी, ठाणे (प.) येथे अनेक सहृदांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात पार पडला. यावर्षी विशेष अतिथी म्हणून न्यायमूर्ती अभय ओक (न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई) व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रसाद मोडक (संस्थापक व संचालक - एन्हायरमेंट मॅनेजमेंट सेंटर) अशा सुविख्यात व्यक्तिमत्वांना व्याख्यान देण्याकरिता कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे राजेंद्र कदम (मुख्य वनसंरक्षक, ठाणे जिल्हा) यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
सुरुवातीला पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास हजिरनीस व उपाध्यक्ष प्रा. विद्याधर वालावलकर यांनी प्रमुख पाहुण्यांना व्यासपीठावर निमंत्रित केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सीता-अशोकाचे रोप लाऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच पर्यावरण दक्षता मंडळाचे “आपलं पर्यावरण” या द्विभाषिक आणि यावर्षीपासून रंगीत स्वरुपात प्रकाशित झालेल्या मासिकाबाबत डॉ. संजय जोशी यांनी माहिती देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्याधर वालावलकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये पर्यावरण दक्षता मंडळाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर रुपाली शाईवाले यांनी पर्यावरण शाळेच्या कार्याचा आढावा घेतला. टिटवाळा येथील “रूंदे” या गावी सुरु असलेल्या “देवराई” प्रकल्पाची माहिती संगिता जोशी यांनी दिली. तसेच सर्व उपस्थितांना देवराई प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले. डॉ.प्रसाद कर्णिक यांनी त्यानंतर प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती अभय ओक यांचे व्याख्यान झाले. डॉ. प्रसाद मोडक यांनी जनसामान्यांच्या माध्यमातून पर्यावरण विकास याविषयी मार्गदर्शन केले तसेच पर्यावरणीय शिक्षणसंस्थाचे महत्व विषद करून सांगितले. यानंतर “ग्रीन लव्हर्स क्लब” व “ग्रीन करियर कोर्सेस” यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या व्यक्तींना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे विशेष अतिथी न्यायमूर्ती अभय ओक यांनी विविध पर्यावरण विषयक कायदे आणि हक्क यांची अगदी सोप्प्या भाषेत ओळख करून दिली आणि राज्यघटनेच्या कलामांतून सापडणारे पर्यावरण विषद करून सांगितले. त्याचप्रमाणे पर्यावरण विषयक कायद्यांवर संशोधन व्हावे आणि त्याचे शिक्षण जनसामान्यापर्यंत पोहोचावे म्हणून संशोधन केंद्रे उभारली जावीत असेही सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम काळे व एन्व्हायरो व्हीजीलचे अध्यक्ष डॉ. विकास हजिरनीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवर, विविध संस्था व उपस्थितांचे आभार संगिता जोशी यांनी मानले व शेवटी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अॅड. प्रवर्तक पाठक यांनी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली.