ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात दिवाळी पहाटला तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष दिसून आला. राम मारुती रोड, तलावपाळीला लोकांचा महापूर आला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गर्दी मात्र अधिक दिसून आली. नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवाळी पहाट साजरी करण्याची परंपरा यंदाही ठाणेकरांनी राखली. आज सर्वांनी एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. पहाटे 6 वाजल्यापासूनच राम मारुती रोड, तलावपाली याठिकाणी हळूहळू तरुणाईने जमण्यास सुरुवात केली आणि सकाळी 8 वाजचा गर्दी वाढू लागली. यावेळी पारंपरिक वेशभूषेत तरुण - तरुणी आले होते. डीजे, बँड आणि ढोल ताशाच्या तालावर तरुणाईने एकच ठेका धरला. मराठी, हिंदी गाण्यांवर नाचण्याचा मनसोक्त आनंद त्यांनी लुटला. कोळी गीतांनी तर यावेळी रंगत आणली. यावेळी केवळ तरुण नव्हे तर महिला वर्ग आणि चिमुकलेदेखील आले होते. एकीकडे ज्येष्ठ नागरिक पहाटे सुरमयी पहाट अनुभवत होते तर दुसरीकडे तरुणाई दिवाळी पहाटचा आनंद लूटत असल्याचे दृश्य शहरात पाहायला मिळाले.
ठाण्यात दिवाळी पहाटला तरुणाईचा जल्लोष आणि उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 2:04 PM