भिवंडी : भिवंडीतही छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. ग्रामीण भागात अनेक ग्रामपंचायतींमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर शहरातही विविध राजकीय पक्षांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. भिवंडी महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात महापौर प्रतिभा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी निंबवली येथील शैलेश प्रतिष्ठानच्या सदस्यांनी शिवचरित्रावर आधारित विविध मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले. महापालिका मुख्यालयात उपायुक्त डॉ. दीपक सावंत, उपायुक्त दीपक झिंगाट, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे उपायुक्त सुभाष झळके, प्रभाग समिती क्रमांक ५ चे सहायक आयुक्त सुधीर गुरव, प्रभाग समिती क्रमांक १ चे सहायक आयुक्त दिलीप खाने, अग्निशमन अधिकारी राजेश पवार, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, निवडणूक विभागप्रमुख गिरीश घोष्टेकर आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भिवंडीत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.