सदानंद नाईक, उल्हासनगर: शिवसेना पक्ष व पक्षाचे धनुष्यबाण चिन्हे शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्याचे जाहीर केल्याने पक्षाच्या पाधिकार्यांनी एकमेकाला पेढे भरवून व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते खासदार जनसंपर्क कार्यालयात उपस्थित होते.
उल्हासनगरात बाळासाहेबांची शिवसेना यांचे शिवसेना ठाकरे गटा पेक्षा पारडे जड असुन शुक्रवारी पक्षाला शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हे दिल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. याचा आनंद साजरा करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी गोलमैदान येथील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकत्र आले. यावेळी कार्यालय परिसरात व शहरातील विविध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. तसेच जनसंपर्क कार्यालयात एकमेकाला पेढे भरून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहर समन्वयक नाना बागुल, शहरप्रमुख रमेश चव्हाण, राजेंद्र सिंग भुल्लर महाराज, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, कुलवंत सिंग सहातो, उपशहरप्रमुख संदीप गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महापालिकेवर शिवसेना-भाजपाची सत्ता येणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"