डहाणू/बोर्डी : जागतिक सागरीकिनारा स्वच्छता दिन शनिवार, 15 सप्टेंबर रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या डहाणू प्रकल्पाअंतर्गत साजरा करण्यात आला. यावेळी पारनाका येथील समुद्रकिनारी राबवलेल्या स्वच्छता मोहीमेत प्रशासकीय यंत्रणा, विद्यार्थी, स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला.
सप्टेंबर महिन्याच्या तिसर्या शनिवारी हा दिन जगभर साजरा केला जातो. या दलाकडून डहाणूत मागील सहा वर्षापासून हा दिन साजरा होत असून शासनाच्या स्वच्छ भारत मिशनचा अविभाज्य घटक बनल्याची माहिती तटरक्षक दलाचे कामांडंट एम. विजयकुमार यांनी दिली. यावेळी डहाणू थर्मल पॉवर स्टेशनचे चीफ सिक्युरिटी ऑफिसर कश्मीरा सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी धर्माधिकारी, एसीजी कॅप्सूल तर्फे सी. एम. यादव, सीआयएसएफचे कमांडर सत्यदेव आर्य उपस्थित होते.
शासनाच्या स्वच्छता अभियानाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. यावेळी पारनाका सागरतटाची स्वच्छता करून प्लॅस्टिक पिशव्या, नायलॉनचे धागे, बाटल्या असा कचरा गोळा करून त्याची नगर परिषदेने विल्हेवाट लावली. या करिता तटरक्षक दल, महसूल विभाग आणि थर्मल पॉवर स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, बाबूभाई पोंदा ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक, स्थानिक मच्छिमार, नागरिक आदींनी सहभाग घेतला. या दलाने उपस्थितांना स्वच्छता संदेश देणारे टीशर्टचे वाटप केले.