मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रा - शोभा यात्रा पारंपरिक वेशात काढण्यात आल्या. गुढीपाडवा शहरात जल्लोषात साजरा करण्यात आला.
आमदार प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने २२ ते ३१ मार्च दरम्यान चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन मीरारोडच्या गोखले मैदान , बेवर्ली पार्क , आर. बी. के. शाळेजवळ करण्यात आले आहे. सकाळी मंगल नगर येथून गुढी पाडवा शोभा यात्रा व देवीच्या मूर्तीची मिरवणूक तुतारी व पुणेरी ढोलताशाच्या गजरात काढण्यात आली. लेझीम पथक व वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी, आ . सरनाईक , पूर्वेस सरनाईक , जिल्हाप्रमुख राजू भोईर , भावना भोईर, विक्रमप्रताप सिंह , विकास व वंदना पाटील सह अनेक लोक सहभागी झाले होते . जेजुरी गडाचा देखावा साकारण्यात आला असून त्यात देवीची शाडू मातीची ७ फूट उंचीची मूर्ती स्थापित केली आहे.
भाईंदर पश्चिम भागात दरवर्षी प्रमाणे सायंकाळी सामूहिक नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली होती. यावेळी ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. घोडबंदर , राई , मुर्धा , मोरवा, पेणकरपाडा आदी गावा गावात देखील स्वागत यात्रा काढण्यात आल्या होत्या. शिवाय शहरातील गृह संकुलां मध्ये पाडव्याचा मोठा उत्साह होता. संकुलां मध्ये पारंपरिक वेशभूषेत रहिवाश्यांनी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले . भाईंदर पूर्व , मीरारोड भागात सुद्धा सामूहिक स्वागत यात्रांचे आयोजन केले गेले होते. नागरिकांसह आजी माजी लोकप्रतिनिधींसह राजकारणी, संस्थांचे प्रतिनिधी गुढीपाडव्याच्या जल्लोषात सहभागी झाले होते. भाईंदरच्या नर्मदा नगर मध्ये यंदाचे चैत्र नवरात्रोत्सव साजरे करण्याचे १० वे वर्ष आहे. यावेळी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची प्रतिकृती साकारली जाणार असल्याचे आयोजक प्रदिक जंगम यांनी सांगितले.