प्रशांत माने कल्याण : विविध प्रकारचे होर्डिंग्ज, बॅनर्स, फलक लावून शहर विद्रुप करण्याचा विडाच जणू राजकारणी व्यक्तींनी उचलल्याचे चित्र कल्याण-डोंबिवली शहरात पहावयास मिळत आहे. एकीकडे ‘स्वच्छता भारत’ अभियानांतर्गत सर्वत्र स्वच्छतेचे आवाहन सुरू असताना दुसरीकडे मात्र केडीएमसी प्रशासनाने ‘विद्रुपीकरणाकडे’ पुरता कानाडोळा केला आहे. विशेष बाब म्हणजे उत्सवांनिमित्त झळकलेले होर्डिंग्ज आणि बॅनर हे उत्सव झाल्यानंतरही कित्येक महिने तेथून हटवले गेलेले नाहीत. धूळखात पडलेले हे बॅनर स्वच्छता अभियानाला हरताळ फासत नाहीत का?, असाही सवाल या निमित्ताने नागरिकांकडून केला जात आहे.कुणीही यावे आणि मोक्याची जागा शोधून बिनधास्तपणे फलक लावावे, असे काहीसे वास्तव कल्याण-डोंबिवलीत दिसते. विशेष म्हणजे, केडीएमसीने जाहिरातीचे कंत्राट दिले आहे. परंतु, या कंत्राटदाराच्या जागांवरही बिनदिक्कतपणे बेकायदा होर्डिंग्ज लावले जात आहेत. यात अधिकृत होर्डिंग्ज झाकोळले जात आहेत. नेते, कार्यकर्ते यांचे वाढदिवस, विविध शुभेच्छा संदेश यांसह अन्य कारणांनी लावल्या जाणाºया अशा होर्डिंग्जनी अतिक्रमण केल्याने पैसे भरून होर्डिंग्ज अथवा बॅनर लावणाºयांचे नुकसान होत आहे. या मोठ्या प्रमाणावर लावल्या जाणाºया होर्डिंग्जमुळे शहर विद्रुप होत आहे, याचे भानही ते लावणाºयांना राहिलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे उत्सवांचे औचित्य सरल्यानंतरही काही सणांचे, उत्सवांचे बॅनर पुराव्याच्या स्वरूपात शहरात लटकताना दिसत आहेत. दसरा, दिवाळी, नवरात्र, कोकण महोत्सव हे सण, उत्सव पार पडल्यानंतर यासंदर्भातील बॅनर आजही निदर्शनास पडतात.न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष -उच्च न्यायालयाने बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी केडीएमसीने माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या कार्यकाळात प्रभाग स्तरावर एक विशेष समितीही नेमली होती.या समितीत प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनाही सामावून घेतले होते. समितीच्या बैठका घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्याच्या देखील सूचना केल्या होत्या. परंतु, ही समितीच आता अस्तित्वात आहे का? हा देखील संशोधनाचा विषय आहे.यासंदर्भात मालमत्ता विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई सुरू असल्याचा दावा केला. या कारवाईसाठी प्रभाग अधिकाºयांना सूचना केल्या आहेत,असेही ते म्हणाले.नामफलकांवरही बॅनरचे अतिक्रमण-शहरांतील मुख्य चौक, धार्मिक स्थळे आणि मोक्याच्या जागा येथे बेकायदा होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला असताना इमारतींची, रस्त्यांची, चौकांची नावे समजण्यासाठी लावण्यात येणाºया नामफलकांवरही राजकीय मंडळींकडून होर्डिंग्ज, बॅनर लावण्यात आलेले आहेत.दुभाजकांमध्ये असलेल्या विद्युत खांबांवरही बॅनर झळकत आहे. अनेकदा हे बॅनर कमी उंचीवर लावले जातात. ते वाहनचालकांना लागून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा होर्डिंग्ज, बॅनरवर कारवाई होणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
उत्सव सरले, पण होर्डिंग्ज उतरेना; केडीएमसी प्रशासनाची डोळेझाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:22 AM