ठाणे : ठाण्यातील दहीहंडीचा उत्साह मावळलेला असतानाच खा. राजन विचारे परंपरेनुसार दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत. उत्सव हे उत्साहातच साजरे होणे गरजेचे आहे. तसेच दहीहंडी हा थरांचा उत्सव नसून सहभागाचा उत्सव आहे, असे सांगून त्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी पाच थरांचीच परवानगी दिली असून गोविंदा पथकांसाठी विमा संरक्षण, सेफ्टी रोप आदी सुविधाही देण्यात येणार असल्याचे सांगितले. मुंबईच्या गोविंदा पथकांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची १ लाख ११ हजार १११ रुपयांची रोख बक्षिसे असलेली दहीहंडी असून स्मृतिचषक देण्यात येणार आहे. तर, ठाणे येथील गोविंदा पथकांसाठी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाची १ लाख ११ हजार १११ रुपयांची रोख बक्षिसे असलेली दहीहंडी व स्मृतिचषक देण्यात येणार आहे. तसेच महिला गोविंदा पथकांसाठी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाची महिला विशेष हंडी ठेवण्यात आली आहे. रात्री १० वाजून १० मिनिटांनी सोहळ्याचा समारोप होईल. आधुनिक प्रकाशयंत्रणेच्या वापराबरोबरच संगीतकला, नृत्यकला सादर होणार असून हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील तारेतारका उपस्थिती दर्शवणार आहेत. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री अनंत गीते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उत्सव उत्साहातच होणे गरजेचे - खा. राजन विचारे
By admin | Published: September 05, 2015 10:24 PM