ठाणे: गुढीपाडव्यानिमित्त श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्यावतीने शनिवार ६ एप्रिल रोजी १८ व्या नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीच्या विविध रंगांचे दर्शन घडविणारी ही स्वागतयात्रा सकाळी ७ वाजता ठाणे शहरात निघणार असल्याची माहिती विश्वस्त डॉ. अश्विनी बापट यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या यात्रेत ठाणे शहरातील प्राचीन मंदिरांना आपल्या पालखीसह तर सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात्रेच्या पुर्वसंध्येला शुक्रवार ५ एप्रिल रोजी सायं. ४ वा. घंटाळी मैदानातून क्रिडाभारती या संस्थेतर्फे विविध मंदिरांना भेट देणारी सायकल रॅली होणार आहे. त्याच दिवशी सायं. ५.३० ते ६ यावेळेत निवेदिका धनश्री लेले या रुद्र व अथर्वशीर्ष या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सायं. ६ वा. श्री कौपिनेश्वर मंदिराच्या प्रांगणात राष्ट्रीय सेविका समिती पौराहित्य वर्गाच्या महिला सामुदायिक अथवर्शीर्ष आणि शिवस्तोत्राचे पठण करणार आहेत. सायं. ७ वा. महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते मासुंदा तलावातील शिवमंदिरात दीपोत्सव होणार असून त्यानंतर श्री गणपती, श्री महादेव, स्वा. सावरकर लिखीत श्री शिवाजी महाराज आरती, स्वातंत्र्य देवात आरती आणि गंगाआरती होणार आहे. सायं. ८ ते १० यावेळेत गणेशघाट आणि अहिल्यादेवी घाट येथे नृत्यवंदना आणि गानवंदनेचा कार्यक्रम होणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ७ वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करुन स्वागतयात्रेस सुरूवात होणार आहे. त्यानंतर श्री कौपिनेश्वर महाराजांची पालखी मंदिरातून निघणार आहे. ही पालखी जांभळी नाका-चिंतामणी चौक मार्गे दगडी शाळेपर्यंत आल्यावर तलावपाळी येथे उभे असलेले विविध विषयांवरचे चित्ररथ या स्वागतयात्रेत सहभागी होणार आहे. ही स्वागतयात्रा तीन पेट्रोल पंप - हरि निवास सर्कल - नौपाडा पोलीस स्टेशन - गोखले रोड - राम मारुती रोड - पु. ना. गाडगीळ चौक - तलावपाळी - गडकरी रंगायतन येथे यात्रा संपन्न होऊन पालखी श्री कौपिनेश्वर मंदिराकडे मार्गस्थ होणार आहे. या यात्रेत महिलांची बाईक रॅली असणार आहे. यात मराठा समाज, तेली समाज, कोळी समाज, बोहरा समाज, पंजाबी समाज, क्षित्रिय भंडारी समाज देखील आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविणार आहेत. गदिमा, सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वषार्निमित्ताने मराठी ग्रंथ संग्रहालयाच्यावतीने चित्ररथावर पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीमधील सर्वपात्रे अवतरणार आहेत तर ठाणे भारत सहकारी बँकेतर्फे अजरामर गीतरामायण या विषयावर चित्ररथ असणार आहे. चित्ररथ स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा, सेल्फीविथ स्वागतयात्रा स्पर्धा, उत्कृष्ट सोसायटी सहभाग अशा विविध स्पर्धा देखील होणार आहेत. या पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष सुहास मेहता, विश्वस्त प्रा. विद्याधर वालावलकर, संजीव ब्रह्मे, अरविंद जोशी, रविंद्र कºहाडकर, निमंत्रक कुमार जयवंत, सहनिमंत्रक शंतनू खेडकर आदी उपस्थित होते.--------------फोटो : स्वागतयात्रा
ठाण्यातील नववर्ष स्वागतयात्रेत घडणार भारतीय संस्कृतीच्या विविध रंगांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 1:39 PM
गुढीपाडव्याच्या निमित्ताने शनिवार ६ एप्रिल रोजी ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांवरन नववर्ष स्वागतयात्रा निघणार आहे.
ठळक मुद्देगुढीपाडव्यानिमित्त श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्यावतीने नववर्ष स्वागतयात्रा स्वागतयात्रेत घडणार भारतीय संस्कृतीच्या विविध रंगांचे दर्शनठाणे शहरातील प्राचीन मंदिरांना आपल्या पालखीसह सहभागी होण्याचे आवाहन