ठाणे: प्रारंभ कला अकादमी आयोजित महिला महोत्सवाचा दुसरा दिवस आज गडकरी रंगायतन येथे रंगला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टनगड़ी व अभिनेत्री सुप्रिया पाठारे उपस्थित होत्या. गेली 17 वर्षे पुण्यात वाहतूक नियंत्रणाचे काम करणाऱ्या 80 वर्षीय प्रभा नेने यांना 'सौदामिनी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मंगला खाडिलकर यांच्या मनोमनी कार्यक्रमाने महोत्सवाची सुरुवात झाली. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभा थत्ते, मंजिरी चुणेकर, भटू सावंत, डॉ. मैत्रेय शहा यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. मैत्रेय शहा यांच्यावतीने त्यांचा पुरस्कार डॉ. उर्मिला कुमावत यानी स्वीकारला.दरम्यान, अभिनेते अजय पूरकर आणि 35 वर्षे 40 जणांचे एकत्र कुटुंब सांभाळणाऱ्या त्या कुटुंबाच्या प्रतिनिधी सुचिता सावंत यांची मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत अकादमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी घेतली. त्यानंतर संदीप गायकवाड़ याचा कॉमेडी शो झाला. यावेळी संदीपने रसिकाना पोट धरून हसविले. डॉ. मेधा मेहेंदळे यांनी उपस्थित महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. त्यानंतर पंकज पाडाले आणि त्याच्या सहका-यांनी नृत्य सादर केले. शेवटी शनिवारी आयोजित केलेल्या महिलांच्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, सर्वांगीचे सर्वेसर्वा कृष्णा भानगे उपस्थित होते. डॉ. भालेराव यांच्या पुढाकाराने हा दोनदिवसीय महोत्सव आयोजित केला होता.
ठाण्यात प्रारंभ कला अकादमीनं आयोजित केलेला महिला महोत्सव उत्साहात साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 6:52 PM