ठाणे : सेलिब्रेटी तरुणीने कोविड सेंटरची कर्मचारी असल्याचे ओळखपत्र मिळवून कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे प्रकरण ठाणे शहरात चांगलेच गाजत आहे. या संपूर्ण प्रकरणाची ठाणे महापालिकेच्या आरोग्य उपायुक्तांच्या समितीमार्फत चौकशी करण्याचे, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.
ठामपाच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रात एका सेलिब्रिटी तरुणीने कोविड सेंटरची सुपरवायझर असल्याचे भासवून लस घेतल्याचे उघड झाले आहे. तिला ओमसाई आरोग्य केअर या ठेकेदार कंपनीने पार्किंग प्लाझाचे सुपरवायझरचे ओळखपत्र लसीकरणासाठी दिले. या प्रकरणाची आरोग्य उपायुक्तांमार्फत चौकशी करून तीन दिवसांमध्ये अहवाल देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान,
महापालिकेचे बोधचिन्ह असलेले बनावट ओळखपत्र बनविणाऱ्या ओमसाई आरोग्य केअर या संस्थेचा मालक आणि कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी वर्तकनगर पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.