धीरज परब
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने अल्ट्रा व्हाईट थिन टॉपिंग अर्थात युटीडब्ल्यूटी पद्धतीच्या ८ रस्त्यांसाठी अंदाजित खर्चा पेक्षा तब्बल १६ कोटी ९५ लाख ६० हजार रुपये इतक्या जास्त दराने ठेके दिले आहेत . एकूण ७९ कोटी ७८ लाख ९१ हजार रुपये खर्चून नव्याने बांधलेल्या ह्या सिमेंट रस्त्यांवर तडे जाण्याचे प्रकार सुरूच आहेत . मुदतीत कामे पूर्ण झाल्याने नागरिक त्रासले आहेत तर झालेले रस्ते तडे जाऊन निकृष्ट असल्याने संताप व्यक्त होत आहे. जास्त दराने ठेके देऊन देखील सिमेंट रस्त्याच्या कामात टेंडर टक्केवारी आणि भ्रष्टाचार बोकाळल्याने कामे निकृष्ठ दर्जाची झाल्याच्या लेखी तक्रारी व आरोप सातत्याने होत आहे.
मीरा भाईंदर महापालिकेत अल्ट्रा व्हाईट थिन टॉपिंग अर्थात युटीडब्ल्यूटी पद्धतीच्या नावाखाली सिमेंट रस्ते बांधण्याचे कामे होत आहेत . युटीडब्ल्यूटी च्या नावाने प्रत्यक्षात मात्र त्या पद्धतीने काटेकोर कामे केली जात नाहीत . सिमेंट रस्ता बनवण्याच्या कामांच्या निविदा देखील पालिकेच्याच अंदाजपत्रकीय रकमे पेक्षा तब्बल ३० टक्के पर्यंत जास्त दराने देण्यात आलेल्या आहेत. भाईंदर पूर्व स्व . प्रफुल्ल पाटील चौक ते विमल डेअरी पर्यंतच्या रस्ताच्या कामाचा खर्च २ कोटी ८५ लाख ८८ हजार रुपयांचा अंदाजित असताना तो तब्बल २९.९० टक्के जास्त दराने वाढवून रिद्धिका इन्टरप्रायझेसला ३ कोटी ७१ लाख ३६ हजार रुपयांना दिला गेला . सदर काम ६ महिन्यात म्हणजेच ७ सप्टेंबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करायचे असताना पण आज २० महिने उलटले तरी देखील काम अपूर्ण आहे. रखडलेले काम व कामाचा दर्जा आदी बाबतीत तक्रारी होऊन देखील पालिकेचा बांधकाम विभाग ठेकेदारास संरक्षण देत आहे.
सिल्व्हर पार्क ते सृष्टी रस्त्याच्या कामाचा खर्च पालिका अंदाजपत्रक नुसार ११ कोटी ५१ लाख ५६५ रुपये इतके होते . सदर काम देव इंजिनियर्सला २९ . ६० टक्के जास्त दराने तब्बल ३ कोटी ४० लाख ८६ हजार रुपये वाढवून देत १४ कोटी ९१ लाख ८७ हजार रुपयांना देण्यात आले. सदर कामाची मुदत ७ ऑगस्ट २०२० पर्यंत असताना काम रखडले. मीरारोड पूर्व येथील साईबाबा नगर ते शीतल नगर रस्त्याच्या कामासाठी ११ कोटी ५२ लाख ६७ हजार रुपये अंदाजित खर्च असताना २३.५० टक्के जास्त दराने श्रीजी कन्स्ट्रक्शन ला देण्यात आले. तब्बल २ कोटी ७० लाख ८८ हजार रुपयांना काम वाढवून दिल्याने कामाचा खर्च १४ कोटी २३ लाख ५५ हजार ३६८ रुपयां वर पोहचला आहे. सदर काम ७ ऑगस्ट २०२० पर्यंत १५ महिन्यात पूर्ण करायचे होते.
शांतीनगर सर्कल ते नया नगर पोलीस चौकी पर्यंतच्या रस्त्याचे काम २५.३० टक्के जास्त दराने श्रीजी कन्स्ट्रक्शन ला देण्यात आले आहे . २ कोटी ७१ लाख ६३ हजार ३२१ इतका अंदाजित खर्च असताना ६८ लाख ७२ हजार रुपये वाढवून देत एकूण ३ कोटी ४० लाख ३५ हजार ६४१ रुपयांना ठेका देण्यात आला आहे . सदर कामाची मुदत ६ महिन्या करिता ७ सप्टेंबर २०१९ पर्यंत असताना हे काम देखील रखडले. नरेंद्र पार्क ते उड्डाणपूल पर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी ८ कोटी ९१ लाख ९ हजार ४३ रुपयांचा अंदाजित खर्च असताना सदर काम २८.५० टक्के जास्त दराने श्रीजी कन्स्ट्रक्शनला देण्यात आले. २ कोटी ५३ लाख ९६ हजार रुपये वाढवून देत एकूण कामाचा खर्च ११ कोटी ४५ लाख ५ हजार रुपयांवर गेला आहे . कामाची १२ महिन्यांची मुदत असल्याने ७ मार्च २०२० पर्यंत पूर्ण करायचे होते . पण सदर काम रखडले.
मीरारोड रेल्वे स्थानक ते भक्ती वेदांत रस्त्याचे काम १८ कोटी ९६ लाख ८४ हजार ३२९ रुपयांचे असताना ते तब्बल २४ कोटी १ लाख ४० हजार ३६० रुपयांना गजानन कन्स्ट्रक्शन ला देण्यात आले आहे . सदर कामाची मुदत १८ महिन्यांची होती . त्यामुळे काम हे ७ सप्टेंबर २०२० मध्येच पूर्ण व्हायला हवे होते . पण आज देखील सदर काम सुरु आहे. भाईंदर पूर्वेचे पालिका क्रीडा संकुल ते ७११ हॉस्पिटल पर्यंतच्या रस्त्याचे कामाचा २ कोटी ५५ लाख ४ हजार ७४५ रुपयांचा अंदाजित खर्च होता . परंतु सदर काम देखील २२ . ६५ टक्के जास्त दराने गजानन कन्स्ट्रक्शनला दिले आहे . ५७ लाख ७६ हजार ८२५ रुपये वाढवून दिल्याने कामाचा खर्च ३ कोटी १२ लाख ८१ हजार ५७० रुपये झाला आहे . सदर काम ७ सप्टेंबर २०१९ पर्यंत ६ महिन्यात पूर्ण करायचे असताना अजूनही काम रखडलेले आहे. दीपक रुग्णालय ते सेव्हन इलेव्हन शाळे पर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे कामाचा पालिका अंदाजित खर्च ३ कोटी ७९ लाख १३ हजार ३५३ रुपयांचा असताना तब्बल २९.९० टक्के जास्त दराने ए . आय. सी इन्फ्रास्ट्रक्चर ला काम देण्यात आले आहे . १ कोटी १३ लाख ३६ हजार रुपयांनी वाढवून सदर काम ४ कोटी ९२ लाख ४९ हजार ४४६ रुपयांना दिले आहे . या कामाची मुदत २८ नोव्हेम्बर २०१९ पर्यंत सदर काम ६ महिन्यात पूर्ण करण्याची असताना आजही सदरचे काम रखडलेले आहे.
युटीडब्लूटी अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील सदर ८ रस्त्यांचे काँक्रीटीकरण करायचे म्हणून मार्च २०१९ मध्ये कार्यादेश दिले गेले . यातील बहुतांशी कामांची मुदत संपून देखील काम मात्र आज हि रखडलेले आहे . कामे रखडल्याने नागरिकाना अतोनात त्रास सहन करावा लागला . सदर रस्त्यांना ठिकठिकाणी तडे गेले असून वरचे सिमेंट उडाले आहे . अनेक ठिकाणी समतल साधलेला नाही . मुख्य नाके - चौक ठिकाणी सिमेंट ऐवजी डांबरीकरण केले गेले आहे. रस्त्यासाठी खोदकाम करण्या पासून एकूणच कामात तांत्रिक बाबी व साहित्याचा दर्जा आदी कडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले आहे. कहर म्हणजे पालिकेने सदर कामांच्या अंदाजित खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून निविदा मागवल्या असताना संगनमताने सदर निविदा तब्बल २२ टक्क्यां पासून ३० टक्क्यां पर्यंत जास्त दराने दिल्या गेल्या आहेत . इतक्या जास्त दराने निविदा देऊन देखील कामांचा दर्जा मात्र सुमार आहे . मोठ्या प्रमाणात टक्केवारी चा भ्रष्टाचार असल्याच्या लेखी तक्रारी व आरोप सातत्याने होत आहे.
ह्या ८ रस्त्यांच्या कामांसाठी पालिका अंदाजपत्रक नुसार ६२ कोटी ८३ लाख ३१ हजार ४८८ रुपये इतका खर्च व्हायला हवा होता . परंतु प्रत्यक्षात मात्र पालिकेने ठेकेदारांना तब्बल १६ कोटी ९५ लाख ५९ हजार ५३६ वाढवून दिल्याने ह्या ८ रस्त्यांच्या कामांचा खर्च तब्बल ७९ कोटी ७८ लाख ९१ हजार २४ रुपये इतक्या वर पोहचला आहे . महापालिका प्रशासन ठेकेदारांना पाठीशी घालत असताना दुसरीकडे सत्ताधारी विरोधी पक्ष देखील या गंभीर प्रकरणी अवाक्षर काढायला तयार नाही . तर ३० टक्क्याने पर्यंत जास्त दराने ठेके देऊन काम मात्र निकृष्ठ होत असताना सिमेंट रस्त्याचा मलिदा कोणा कोणाच्या घशात गेला ? असा सवाल नागरिक करत आहेत.