कल्याण : आमदार निधीतून पूर्व भागात केलेल्या विकासकामांच्या मुद्यावरून शिवसेनेच्या दोन नगरसेविका आमनेसामने आल्या. त्यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीपर्यंत पोहोचले. याप्रकरणी दोन्ही नगरसेविकांनी एकमेकांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी कल्याण पूर्वेतील सध्याचा प्रभाग क्रमांक ९९ मध्ये विकासकाम करण्यासाठी आमदार निधी दिला होता. या प्रभागात नागरिकांनी अभिनंदनाचा बॅनर लावला होता. शिवसेनेच्या शीतल मंढारी या प्रभागाच्या नगरसेविका आहेत. त्यांच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी काळे या प्रभागाच्या नगरसेविका होत्या. २०१५ मधील महापालिका निवडणुकीत काळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या मंढारी यांच्या शेजारच्या प्रभागातून निवडून आल्या.नागरिकांनी लावलेल्या बॅनरवर काळे यांचा फोटो व उल्लेख असल्याने या बॅनरला मंढारी यांनी आक्षेप घेतला. आपल्या प्रभागात काळे यांना श्रेय देणारा बॅनर लावल्याने त्यांनी हरकत घेतली. ही बाब काळे यांना समजताच त्यांनी मंढारी यांना बोलवून घेतले. मंढारी व त्यांच्यासोबतचा कार्यकर्ता सुमित तेथे पोहोचला असता काळे व मंढारी यांच्यात जोरदार भांडण झाले. एकमेकींना त्यांनी शिवीगाळ केली. या वेळी काळे यांनी मंढारी यांना मारहाण केली. सुमित याने त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. दोन्ही नगरसेविकांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी काळे यांच्या तक्रारीच्या आधारे मंढारी व त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्ता सुमितविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तर, मंढारी यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी काळे यांच्याविरोधात अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात काळे यांनी सांगितले की, बॅनर नागरिकांनी लावला होता. हे काम मंढारी या निवडून येण्यापूर्वी झालेले आहे. त्यामुळे त्यांनी त्या बॅनरला आक्षेप घेण्याचे कारण नाही. एरव्हीही मंढारी या माझी बदनामी करत फिरतात. त्याचा जाब विचारण्यासाठी मंढारी यांना बोलवले असता त्यांच्यासोबत असलेल्या सुमितने माझ्या हातावर फटका मारून माझा विनयभंग केला आहे.दरम्यान, मंढारी यांनी सांगितले की, माझ्या प्रभागात तिच्या कामाचा बॅनर का, यासाठी मी आक्षेप घेतला. तिने मला बोलावून घेत मला मारहाण केली. शिव्या दिल्या. माझ्या चारित्र्यावर चिखलफेक केली. त्याचा पुरावा माझ्या कार्यकर्त्याने मोबाइलमध्ये चित्रित केला आहे.ही घटना रात्री घडल्यावर शिवसेनेच्या नेते मंडळींनी मध्यस्थी करून दोन्ही नगरसेविकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच एकमेकांविरोधात तक्रार देऊ नका, अशी समज दिली होती. मात्र, दोन्ही नगरसेविकांनी पक्षाच्या नेत्यांचे न ऐकता तक्रार दाखल केली.सत्तेचे अपयशमहापालिकेच्या रुग्णालयातून दिल्या जाणाºया गोळ्यांत तारा सापडतात. सर्पमित्राला उपचाराविना ताटळकत ठेवल्याने त्याचा मृत्यू झाला.नवजात बालकाचा जन्माला येण्याआधीच उपचाराअभावी मृत्यू झाला. शहरात कचºयाचे ढीग, खड्डे अशा विविध समस्यांनी कल्याण-डोंबिवलीतील नागरिक त्रस्त आहेत.सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविका श्रेयाच्या वादातून हाणामारी करत आहेत. यावरून सत्तेचे अपयश व नागरिकांना बुरे दिन आले आहेत, अशी तिखट प्रतिक्रिया मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिली आहे.काळे यांच्या अटकेसाठीरास्ता रोकोमंढारी यांच्या तक्रारीच्या आधारे काळे यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. तो दाखल झाल्यापासून २४ तासांच्या आत काळे यांना पोलिसांनी अटक केलेली नाही. काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी मंढारी व त्यांच्या समर्थकांनी कल्याण पूर्वेतील विजयनगर चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
सेनेच्या नगरसेविकांत हाणामारी, कल्याण पूर्वेतील घटना , पोलिसांत परस्परांविरोधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 6:29 AM