ठाणे : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ठाणे महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या सुकाणू समितीला सादर केलेल्या एकूण ४१४ कोटी रुपयांच्या ४ प्रकल्पांना बुधवारी मंजुरी मिळाली. यामुळे सर्वांसाठी घरे या योजनेला गती मिळणार असून याअंतर्गत एकूण ३ हजार घरे बांधण्यात येणार आहेत.ठामपाने बेतवडे, म्हातर्डी आणि पडले अशा शासनाच्या जागेवर चार ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४ प्रकल्प अहवाल सादर केले होते. ४१४ कोटी रुपयांच्या या चार प्रकल्प अहवालांना राज्याचे गृहनिर्माण सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीने जून २०१७ मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर, नियमानुसार हा प्रकल्प अहवाल केंद्रीय सुकाणू समितीकडे मान्यतेसाठी पाठवला होता. या समितीच्या बुधवारी २३ आॅगस्ट २०१७ रोजी आयोजित बैठकीत मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पांना मान्यता मिळाल्याने सर्वांसाठी घरे हा प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे.या योजनेंतर्गत बेतवडे येथे दोन प्रकल्प, म्हातर्डी आणि पडले येथे प्रत्येकी एक प्रकल्प असे एकूण चार प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. योजनेतील ४० टक्के घरे ही प्रकल्प बाधितांसाठी, ४० टक्के घरे परवडणारी घरे या योजनेखालील असणार आहेत. तर, २० टक्के घरे ही मध्यम उत्पन्न गटातील व्यक्तींना माफक दरात विकण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री आवासची तीन हजार घरे, ४१४ कोटींच्या प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 5:51 AM