ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांकडून मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न होणे असे प्रकार होताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाकारता येत नाही. अशा बेजबाबदार नागरिक, आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य पथकाने ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना दिल्या. तिसरी लाट रोखण्याकरिता ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना पुरेशा लसी पुरवण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारने धाडलेल्या पथकाच्या या इशाऱ्याबाबत सर्वसामान्य नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. लसींचा पुरेसा साठा पुरवण्यात सरकारला येत असलेल्या अपयशाबद्दल या समितीच्या सदस्यांनी चकार शब्द काढला नाही.
महाराष्ट्र राज्याचे कोविड-१९ नोडल अधिकारी तथा गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे उपसंचालक डॉ. अजित शेवाळे यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासमवेत ठाणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची पाहणी केली. तसेच कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे ठाणे महापालिकेसह जिल्ह्यातील इतर महापालिकांनी कोविडचा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासह महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत तिसऱ्या लाटेसाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कशी सज्ज आहे, याची माहिती विविध महापालिकांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिली. यावेळी केंद्रीय समितीने काही महत्त्वाच्या सूचना महापालिकांना दिल्या. दुसऱ्या लाटेदरम्यान आरोग्य यंत्रणेतील ऑक्सिजनचा तुटवडा, खाटांची अपुरी संख्या, औषधांचा अपुरा पुरवठा याचा फटका बसला होता. संभाव्य तिसऱ्या लाटेत कोणत्याही प्रकारे गाफील राहू नका, अशा सूचना समितीने केल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि तरुणांची मदत घेऊन त्यांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद वाढवून जनजागृती करण्यात यावी. केवळ तंत्रज्ञानावर भर देऊ नका, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. जे नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसतील, तसेच मास्कचा वापर करीत नसतील अशांवर कारवाई करा, असे समितीने बजावले आहे.
कोविड वॉर रूम, कोविड सेंटर व संसर्गरोग तपासणी प्रयोगशाळेला पथकाने भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. महापालिकेच्या लसीकरण केंद्राची पाहणी केली. खासगी कोविड रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत पथकाने समाधान व्यक्त केले.
तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता लक्षात घेऊन लहान मुलांसाठी पार्किंग प्लाझा रुग्णालयात १०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये ५० खाटा ऑक्सिजनच्या तर २५ खाटा अतिदक्षता विभागात आहेत. २५ व्हेंटिलेटर खाटांचीही व्यवस्था केली आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
..........
वाचली