ठाणे : भारत सरकारच्यावतीने देण्यात येणारा पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२० ठाणे जिल्हा परिषदेच्या धसई ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. शहापूर तालुक्यातील ही ग्रामपंचायत आहे.
राज्यातून पुरस्कृत झालेल्या १४ ग्रामपंचायत मध्ये ठाणे जिल्ह्यातील धसई ग्रामपंचायतचा समावेश झाला असून जिल्ह्यातील ही एकमेव ग्रामपंचायत आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत) चंद्रकांत पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) डी.वाय.जाधव यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे अभिनंदन केले.
केंद्र सरकारने या पुरस्कारासाठी शंभर गुणांची प्रश्नावली तयार केली होती. ऑनलाइन पद्धतीने ही माहिती शासनाला सादर करण्यात आली होती. यामध्ये स्वच्छता, नागरी सुविधा, नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन, ई.गव्हर्नरन्स, आदी क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीच्या कामाचे स्वयं मूल्यमापन कमिटीने केले होते. धसई ग्रामपंचायतीने गावात या सगळ्या निकषांची पूर्तता केली असून हे गाव स्वयंपूर्ण गाव आहे. शहापूर तालुक्यात असणारे हे गाव स्वातंत्र्यसेनानीचे गाव म्हणून ओळखले जाते. तीन महसुली गावे, दोन पाडे, व वस्ती अशी गावाची रचना आहे. गावात सर्व प्रकारच्या मूलभूत सोई-सुविधा नागरिकांना पुरविण्यात येतात. त्यामुळे यापूर्वी देखील गावाला हागणदारी मुक्त गाव, तंटामुक्त गाव आदी पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. असे सरपंच मुकुंद पारथी, ग्राम विस्तार अधिकारी बी.बी.पष्टे सांगतात.
कोणताही पुरस्कार मिळणे ही केलेल्या कामाची पोहोच पावती असून आपल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील धसई सारख्या ऐतिहासिक ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही कौतुकाची बाब असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली दिलीप पाटील यांनी सांगितले. तर राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार ठाणे जिल्हा परिषदे च्या धसई ग्रामपंचायतीला जाहीर होणे ही आपल्या सगळयांसाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी गावातील नागरिक, सरपंच मुकुंद पारथी, उप सरपंच गुलाब भोईर, ग्राम विस्तार अधिकारी बी.बी.पष्टे,, शहापूर गट विकास अधिकारी अशोक भवारी, सहाय्यक गट विकास अधिकारी सुशांत पाटील या सगळ्यांच्या टीम वर्कचे हे फल आहे अशी मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यातील धसई ग्रामपंचायतीचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव होणे ही जिल्हावासीसाठी सार्थ अभिमानाची घटना आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायती गतिमान होत असल्याचे हे उदाहरण असल्याचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितले.