- नितिन पंडीत
भिवंडी- केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल , डिझेलव घरगुती वापराच्या गॅस व इतर वस्तूंची दरवाढ करून भाजप सरकारने देशातील सामान्य जनतेचा गळा घोटण्याचे काम केले असून या बेशर्म व नफेखोर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम असून मुजोर भाजप सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत उलथून टाकल्याशिवाय काँग्रेसपक्ष सुस्त बसणार नाही अशी प्रतिक्रिया काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भिवंडीत शनिवारी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी सोनाळे येथे आयोजित केलेल्या जाहीर कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष माजी खासदार सुरेश टावरे , तालुकाध्यक्ष राकेश पाटील , शहापूर तालुकाध्यक्ष महेश धानके, कल्याण ग्रामीण अध्यक्ष परशुराम पितांबरे, अंबरनाथ ग्रामीणचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील , मुरबाड ग्रामीणचे तालुकाध्यक्ष चेतनसिंग पवार यांच्यासह , भिवंडी शहराध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांच्यासह भिवंडी शहर व ग्रामीण भागातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या इंधन दर वाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून मोदी सरकारच्या दर वाढी विरोधात राज्यभर काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून सुमारे २० हजारहुन अधिक स्वाक्षरी पत्रक यावेळी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे माजी जिल्ह्याध्यक्ष दयानंद चोरघे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केले.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षाच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले असून दिवसेंदिवस प्रत्येक वस्तू महाग होत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सामान्य नागरीकांच्या आवाक्याबाहेर गेला असून मोदी सरकारने जनतेला कोणताही दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही, उलट कररूपाने करोडो रुपयांची लूट चालवली आहे. पेट्रोलने शंभरी पार केली असून डिझेल दर शंभरी जवळ पोहचले आहे. केंद्र सरकार रस्ते विकासाच्या नावाने १८ रुपये तर कृषी विकासाच्या नावाने ४ रुपये असे २२ रुपये विकासाच्या नावाने लुटत असल्याचा खुलासा देखील यावेळी नाना पटोले यांनी केला .
यावेळी अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असतानाही मोदी सरकार तेल दरांमध्ये भरमसाठ कर लावून जनतेची लूट करत असून मोदी सरकारने पेट्रोल डिझेलवरील करामधून मागील ७ वर्षात तब्बल २२ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्या आला. गॅस दर वाढीमुळे उज्ज्वला योजनेतील लोकांनाही आता गॅस सिलेंडर घेणे परवडत नसून डिझेल महाग झाल्याने सार्वजनिक तसेच मालवाहतुकही महाग झाली. खाद्यतेलही २०० रुपये लिटर झाले असल्याने या दरवाढीत सर्वसामान्यांबरोबरच मध्यमवर्गही भरडला जात असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केला.