मीरारोड - मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना सशस्त्र दरोड्याच्या उत्कृष्ट तपासा प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून केंद्रीय गृहमंत्री पदक मंजूर करून गौरवण्यात आले आहे.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मीरारोडच्या शांती नगर सेक्टर ४ मधील एस कुमार गोल्ड ह्या सराफा पेढीवर ७ जानेवारी २०२१ रोजी पिस्तूल चा धाक दाखवत ९५ लाख ५० हजारांचे दागिने दरोडेखोरांनी लुटून नेले होते . त्यावेळी गुन्हे शाखेचे निरीक्षक असलेल्या वनकोटी व पथकाने ह्या दरोड्याच्या गुन्ह्याचा कसून तपास करत ५ आरोपीना शोधून काढले.
चार आरोपीना उत्तर प्रदेश मधून तर एकास नालासोपारा येथून पकडण्यात आले होते. त्यांच्या कडून ३१ लाखांचे दागिने, १४ लाख रोख, एक रिव्हॉल्व्हर , एक देशी बनावटीचा कट्टा व ३७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. अटक आरोपी हे सराईत असून अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मकोका अन्वये कारवाई करण्यात येऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले . ह्या गंभीर गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्या बद्दल वनकोटी यांना केंद्रीय पदक मंजूर झाल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे .