कल्याण : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेचा रेल्वे उड्डाणपूल २७ मे पासून बंद करण्यात येणार असल्याचे रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेस कळवण्यात आलेले आहे. या पुलाच्या कामाचे टेंडर दोन महिन्यांनंतर काढण्यात येणार आहे. जर कामच दोन महिन्यांनी सुरू होणार असेल, तर दोन महिने आधीच पूल वाहतुकीसाठी बंद ठेवून रेल्वे प्रशासनाकडून महापालिका व नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा मुद्दा स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.सभापती म्हात्रे यांनी यासंदर्भात माहिती दिली की, जुलै २०१८ मध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह महापौरांनी कोपर दिशेच्या रेल्वे उड्डाणपुलाची पाहणी केली होती. त्यावेळी महापालिकेचे आयुक्तही सोबत होते. रेल्वेच्या अधिकारीवर्गाने हा पूल धोकादायक नसल्याची माहिती त्यावेळी दिली होती. आता १० महिन्यांनंतर रेल्वेला पूल धोकादायक असल्याचा साक्षात्कार झाला आहे. मध्य रेल्वेस्थानकातील पूल पडण्याच्या दुर्घटना झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून २८ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट आयआयटीकडून करून घेण्यात आले. या अहवालाचा हवाला देत २७ मे पासून कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून महापालिकेस कळवण्यात आले आहे. ज्या अहवालाचा उल्लेख केला आहे, तो अहवाल महापालिकेस रेल्वेने दिलेला नाही. त्याचबरोबर देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेची आहे. रेल्वे नागरिकांना पूल बंद करून वेठीस धरत आहे. रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार असल्याचा आरोप म्हात्रे यांनी कोपर पूल बंद करण्याच्या मुद्द्यावरून केला आहे. पूल बंद करण्याचे पत्र सात दिवस आधी पालिकेस दिले आहे. मग पर्यायी मार्गाचे नियोजन महापालिका कसे करायचे, असे ते म्हणाले.>कोपर पुलाच्या बंदीवर पर्याय काय?रेल्वेने २७ मे रोजी कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद केल्यास ठाकुर्ली रेल्वे फाटक रेल्वेने बंद केले होते. ते खुले करण्यात यावे. डोंबिवली पश्चिमेतून पूर्वेला जाणारी वाहने या फाटकातून जातील. तर पूर्वेतून पश्चिमेला येणारी वाहने ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलावरून मार्गक्रमण करतील. तसेच आयरेगाव ते कोपर या भागातील रेल्वे क्रॉसिंगही रेल्वेने खुले करून द्यावे. हे दोन पर्याय मान्य केल्याशिवाय रेल्वेने कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करू नये. यासंदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह उद्याच रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
मध्य रेल्वेकडून महापालिकेसह नागरिक वेठीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 12:34 AM