डोंबिवली - मध्य रेल्वे मार्गावर अंबरनाथ-बदलापूर स्थानकादरम्यान शुक्रवारी (28 डिसेंबर) सकाळी रेल्वे रुळ तुटल्यानं वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. रोजच होणा-या या खोळंब्यांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेतच झालेल्या बिघाडामुळे प्रवाशांना संपात व्यक्त केला आहे.
सकाळी 7.33 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी सुमारे तासाभराचा कालावधी लागला. कर्जतहून सकाळी 6.33 वाजता निघालेली लोकल बदलापूर-अंबरनाथ अप मार्गावर आल्यानंतर रेल्वे रुळ तु़टल्याचे लक्षात आले.
यामुळे सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या गाड्या काही काळ बदलापूर स्थानकावर खोळंबल्या व मध्य रेल्वेची लोकल वाहतूक ठप्प झाली होती. या खोळंबामुळे बदलापूर ते कल्याणदरम्यानच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान तासाभराच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरू झाली असली तरी या मार्गावरील गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्याचं कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचं काम सुरू केलं. युद्धपातळीवर काम करत कर्मचा-यांनी बिघाड दुरुस्त केला.
सुदैवानं रुळ तुटल्याचे वेळीच निदर्शनास आले. यामुळे मोठा अपघात टळल्याचे बोलले जात आहे. थंडीच्या दिवसात ट्रॅक फ्रॅक्चर होण्याच्या घटना घडतात. पण शुक्रवारची घटना भयंकर असून अशा पद्धतीनं ट्रॅक तुटणे ही धोक्याची घंटा असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.