पावसाळा सुरू झाला की, वाहनचालक आणि नागरिकांच्या पोटात गोळा येतो, कारण आपण रस्त्यावरून जात आहोत की बोटीतून हेच कळत नाही. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थिती निर्माण होते. मात्र यंदा ठाण्यातील रस्ते चकाचक असून पावसाळ््यात खड्डे पडणार नाही असा दावा प्रशासनाने केला आहे. ठाणे पालिका रस्ते चांगले ठेवू शकते, तर अन्य पालिकांना हे का जमत नाही, हा खरा प्रश्न आहे. अजून मान्सून सुरू झालेला नाही. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची काय अवस्था आहे, याचा आढावा घेतला आहे ‘लोकमत’चे प्रतिनिधी अजित मांडके, सचिन सागरे, पंकज पाटील आणि सदानंद नाईक यांनी.दरवर्षी पावसाळा सुरु झाला की पहिल्याच पावसात ठाण्यातील बहुतेक रस्त्यांची चाळण होत होती. त्यामुळे प्रशासनावर वांरवार टीकेची झोड उठत होती. मागीलवर्षी तर खड्यांवरुन प्रशासन चांगलेच अडचणीत आले होते. परंतु आयुक्तांनी घेतलेल्या काही धाडसी निर्णयामुळे यंदाचे त्याचे परिणाम पावसाच्या आधीच दिसून आले आहेत. ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर, सेवा रस्ते तसेच अंतर्गत असलेले महत्वाच्या रस्त्यांची डागडुजी पावसापूर्वीच करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या पावसानंतरही ठाण्यात वाहनचालकांचा प्रवास हा सुसाट झाला आहे. ‘रिपोर्टर आॅन दि स्पॉट’च्या माध्यमातून शहरातील या मुख्य रस्त्यांची पाहणी केली असता हे रस्ते तूर्तास तरी सुस्थितीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे किमान संपूर्ण पावसाळ्यात हे रस्ते उखडले जाऊ नये अशी याचना मात्र ठाणेकरांना केली आहे.शहरात आजच्याघडीला ३५६ किलोमीटरचे रस्ते असून त्यातील १०८ किलोमीटरचे रस्ते हे कॉंक्रिट आणि यूटीडब्ल्युटी पध्दतीने करण्यात आले आहेत. तर उर्वरित २४८ किलोमीटरचे रस्ते हे आजही डांबरी आहेत. परंतु याच डांबरी रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दरवर्षी दिसून आले आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेला काही वेळेस पाऊस थांबण्याची वाट बघावी लागत होती. तर काहीवेळेस तात्पुरत्या स्वरुपात पेव्हरब्लॉक लावणे, खडी टाकणे असे प्रकार सुरु असतात. परंतु यामुळे त्या ठिकाणी पुन्हा खड्डा पडला जात होता. त्यामुळे या सर्वांवर रामबाण उपाय करण्यासाठी पालिकेने तीन वर्षापूर्वी जेट पॅचर मशीनचा वापर केला होता. त्यानंतर पुन्हा पॉलिमरसह इतर नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा सुध्दा वापर केला होता. परंतु हे सर्वच प्रयोग फोल ठरल्याचे दिसून आले.मागील वर्षी तर खड्यांमुळे प्रशासनावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती. त्यामुळे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यापुढे नवीन रस्ते हे केवळ यूटीडब्ल्युटी आणि काँक्रिटचे केले जातील असे स्पष्ट केले होते. तसेच पुढीलवर्षी ठाणेकरांना खड्यातून प्रवास करावा लागू नये यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले होते. तसेच नव्याने रस्त्यांची कामे हाती घेतली होती. यामध्ये मागील वर्षी ९०० कोटींच्या रस्त्यांचे कामांचे प्रस्ताव मंजूर केले. त्यानंतर आता मधल्या काळात ७०० कोटींच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांची कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे भविष्यात ठाणेकरांना खड्डेमुक्त प्रवासाची हमीच पालिकेने या माध्यमातून देऊ केली आहे. या रस्त्यांच्या मोहिमेत वारंवार नादुरुस्त होणारे रस्ते, त्यातील काही नॉन डीपी रस्ते, डीपी रस्ते, नूतनीकरणाचे रस्ते, मिसिंग लिंक, कॉंक्रिटचे रस्ते आणि यूटीब्ड्युटीचे असे एकूण ६९८.२७ कोटींची कामे करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच ३७ चौकांचे सुशोभीकरणही केले जात असून मिसिंग लिंकचे १३ रस्ते विकसित केले जात आहेत. याशिवाय जुन्या ठाण्याच्या विकासात अडसर ठरणाऱ्या रस्त्यांचे नियोजनही पालिकेने आखले असून नऊ मीटरपेक्षा कमी रूंदी असलेल्या रस्त्यांमुळे जुन्या ठाण्याचा रखडलेला विकास आता मार्गी लागत आहे.दरम्यान, यंदा ठाणेकरांना खड्यातून प्रवास करावा लागू नये यासाठी महापालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वीच्या कामांमध्ये रस्त्यांच्या कामांनाही महत्व देण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. घोडबंदर भागातील मुख्य रस्ते, सेवा रस्ते, उड्डाणपुलावरील रस्ते आदींसह इतर भागातील रस्तेही सुस्थितीत आणले गेले आहेत. शिवाय ज्या रस्त्यांवर मलनिसारण वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. त्याठिकाणचे रस्तेही वाहतुकीसाठी आता सज्ज झाले आहेत. अंतर्गत भागात काही ठिकाणी मलनिसारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरु असल्याने त्याठिकाणच्या रस्त्यांची डागडुजी करण्याचे तेवढे शिल्लक आहे. परंतु हे प्रमाण अतिशय कमी आहे. शिवाय पावसाळ्यात एखाद्या रस्त्याला खड्डा पडलाच तर त्यासाठीही पालिकेने विविध प्रयोग हाती घेण्याचे निश्चित केले आहे. तसेच प्रत्येक प्रभाग समितीनुसार २५ लाखांची तरतूद ठेवण्यात आली आहे. शिवाय २ कोटींची अतिरिक्त तरतुदही ठेवण्यात आली आहे. तर एखाद्या वेळेस पावसाळ्यात रस्त्याला खड्डा पडलाच तर त्यासाठी अत्याधुनिक स्वरुपाचे तंत्रज्ञान वापरून खड्डे बुजविले जाणार आहेत.
पावसाळ्यातही ठाण्यातील रस्ते राहणार चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:28 AM