भिवंडी: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आंदोलनाचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरायला सुरुवात झालेली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन हिंसक होत असताना भिवंडी शहरात सकल मराठा समाजातर्फे भिवंडीतील उपविभागीय कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.
सकल मराठा समाजाचे सुभाष माने,साईनाथ पवार,अशोक कुमार फडतरे,अरुण राऊत,राजेश चव्हाण,भूषण रोकडे,इंद्रजित घाडगे,वनिता शिंदे यांसह मोठ्या संख्येने भिवंडी शहरातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपोषण आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.
यापूर्वी मराठा समाजाने विश्वविक्रमी ५८ मोर्चे शांततेच्या मार्गाने काढलेले होते,त्या प्रमाणेच भिवंडीतील हे आंदोलन सुद्धा शांततेच्या मार्गाने सुरू असून मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचा सरकारने गांभीर्याने विचार करावा अन्यथा मनोज जरांगे पाटील यांच्या निर्देशा नंतर पुढील आंदोलन अजून तीव्र केले जाईल असा इशारा सकल मराठा समाजाचे सुभाष माने यांनी दिला आहे.