भिवंडी : तालुक्यातील वाशेरे गावातील शेतकऱ्यांना विकासकाने मागील चार वर्षांपासून भाडे दिले नसून गोदामांचा ताबा ही देत नसल्याने हवालदिल झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी साखळी उपोषण मागील चार दिवसांपासून सुरू केले आहे.
पडघा कल्याण रस्त्यावरील वाशेरे आमणे या गावातील सुमारे दोनशे एकर जमीन रेनिसेंस इंडस इन्फ्रा प्रा.ली.या कंपनीने शेतकऱ्यां सोबत काही जमीन विकत घेत सुमारे दोनशे एकर शेतजमीन विकसित करण्याच्या करारावर २००७ ते २०१२ दरम्यान घेतली.जमिनीच्या शासकीय व्यवहारासाठी शेतकऱ्यांकडून कुलमुखत्यार पत्र बनवून घेतले .या कागदपत्रांच्या आधारे विकासक कंपनीने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण ठेवून द डिझाईन इंडिया ग्रुप कडून कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले.परंतु त्यानंतर प्रोजेक्ट डबघाईस आल्याने कंपनी दिवाळखोरीत निघाली.त्यामुळे शेतकऱ्यांना मागील पाच वर्षां पासून त्यांच्या जमिनीचे भाडे देणे कंपनीने बंद केले.व जमिनीचा ताबा ही दिला जात नाही. कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने फेब्रुवारी २०२३ शेतकरी व कंपनी यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यातून शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही.अखेर हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी २९ जानेवारी पासून वाशेरे गावात रेनिसेंस इंडस इन्फ्रा प्रा.ली. या गोदाम संकुलाच्या प्रवेशद्वारा शेजारी साखळी उपोषणास सुरवात केली आहे.
शेतकऱ्यांवर गोदाम विकासकाने केलेल्या फसवणुकी मुळे भाडे मिळत नाही तर गोदामांचा ताबा ही दिला जात नाही यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले असून,शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी वरील गोदामात वाराई काम करू देण्यास मज्जाव केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे शासनाने वेळीच लक्ष देवून आमच्या जमिनी आमच्या ताब्यात मिळवून द्याव्यात अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिलीप केणे यांनी दिला आहे.या आंदोलना ठिकाणी भिवंडी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांची संबंधित गोदाम विकासक यांच्या सोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे.