भिवंडी - भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असून, सोनसाखळी चोरीच्या घटनेत प्रसंगावधान राखीत एका अट्टल चैन स्नाचिंग करणाऱ्यास पकडून भिवंडी तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले. या गुन्ह्याचा तपास करीत असताना भिवंडी तालुका पोलिसांना तब्बल दहा गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले आहे. यामध्ये एकूण सव्वा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती तालुका पोलिसांनी शनिवारी दिली आहे. मोहम्मद करीबशाह सय्यद वय २६ रा.आंबिवली कल्याण असे अटक आरोपीचे नाव आहे.
तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील आंबेशिवपाडा या गावातून ११ फेब्रुवारी रोजी रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकी वरून आलेल्या चोरट्याने हिसकावले होते. महिलेच्या आरडाओरडानंतर नागरीकांनी भरधाव वेगात दुचाकी घेऊन पळून जाणाऱ्या चोरट्यास पकडून भिवंडी तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले .त्यांनतर पोलीस उपअधीक्षक जितेंद्र आगरकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व पो उप निरी प्रल्हाद तोडसे,जयवंत मोरे,अमोल फरकुटे,कुणाल भामरे,सुशील पवार,के जी काळढोके,भाऊ भोईर,दामोदर पवार या पोलीस पथकाने आरोपीस ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पाच सोनसाखळी चोरी,चार चोरी व एक वाहन चोरी अशा दहा गुन्ह्यांची कबुली दिली.
या आरोपीकडून १३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे दागिने व एक वाहन जप्त करीत सात लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.या गुन्ह्यांमध्ये तालुका पोलीस ठाणे येथील सात,पडघा व शहापूर व रबाळे पोलीस ठाणे येथील प्रत्येकी एक अशा गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे .