ठाणे : राजकीय पूर्ववैमनस्यातून सोनू पाल आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी वागळे इस्टेट विभागाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर मेटकरी आणि धनंजय कावळे यांच्यावर चाकू, बाम्बू आणि दगडाने हल्ला केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या हल्ल्याचे शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे हे सूत्रधार असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली आहे.रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास रघुनाथनगर येथील कशिश पार्क सोसायटीतील सागर मेटकरी आणि धनंजय कावळे या दोघांना सोनू पाल आणि त्याच्या साथीदारांनी जबर मारहाण केली. त्यानंतर बाम्बू, दगड आणि चाकूनेही त्यांच्यावर हल्ला केला. यात मेटकरीच्या हातावर चाकूचा वार झाला असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.कशिश पार्क येथील स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले, रूपाली रेपाळे आणि विकास रेपाळे यांनी २३ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास सुजाता कोळमकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या सुनेला आणि पतीला शिवीगाळ आणि दमदाटी केली होती. यात त्यांच्या कुटुंबीयांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप आहे. त्या वेळी विकास रेपाळेंनी या मंडळातील कार्यकर्त्यांना दमबाजीही केली होती. याचसंदर्भात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात नम्रता भोसले, रूपाली रेपाळे यांच्याविरुद्ध कोळमकर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. हाच राग मनात धरून रविवारी हा हल्ला झाला. यासंदर्भात भाजपा युवा मोर्चा, ठाणे शहराध्यक्ष ऋषिकेश आंग्रे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांनी वागळे इस्टेटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांची सोमवारी दुपारी भेट घेतली. याप्रकरणी रेपाळे हे सूत्रधार असून त्यांनाही अटक झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी या कार्यकर्त्यांनी या वेळी केली. यासाठी त्यांनी मालेकर यांना काही काळ घेरावही घातला होता. मात्र, रेपाळे यांचे नाव एफआयआरमध्ये नसल्याचे मालेकर यांनी या कार्यकर्त्यांना सांगितले. परंतु, यात कोणीही दोषी आढळले तरी संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन मालेकर यांनी या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना दिले.डिग्रीच्याही तक्रारीचा राग... : विकास रेपाळे यांची इंजिनीअरिंगची खोटी डिग्री असल्याबाबत कशिश पार्कचे रहिवासी प्रशांत जाधव यांनी १५ आॅगस्ट २०१७ रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दीड महिना उलटूनही याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. याचाच पाठपुरावा मेटकरी यांच्याकडून करण्यात येत होता. त्याचाही वचपा काढल्याचा आरोप प्रशांत जाधव यांनी केला आहे.कशिश पार्कमधील सागर मेटकरीवर हल्ला केल्याच्या बातम्या पेरण्यात येत आहेत. या घटनेशी आपला दुरान्वयेही संबंध नाही. आपण त्या वेळी अंधेरी येथे होतो. दाखल गुन्ह्यात कुठेही आपल्या नावाचा उल्लेख नाही. उलटपक्षी सागर मेटकरी आणि प्रशांत जाधव हेच गेली अनेक महिने आपल्याविरुद्ध बातम्या पेरत आहेत. शिवाय, सागरने स्वत:च वार करून घेतल्याची आपली माहिती आहे. -विकास रेपाळे, नगरसेवक, शिवसेना
राजकीय वैमनस्यातून चाकूहल्ला; शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 3:59 AM