पंकज रोडेकर ठाणे : कोकणात जलदगतीने जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमधील चाकरमानी नवीन वर्षापासून ठाण्यात तयार होणारा चहा आणि ब्रेकफास्टची चव चाखत आहेत. अशा प्रकारे ऐतिहासिक असलेल्या ठाणे रेल्वेस्थानकात खाद्यपदार्थ लोड होण्याची रेल्वेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.मुंबई ते कोकणातील करमाळी हे ५५२ किमीचे अंतर अवघ्या आठ तासांत कापणारी तेजस एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटते. तसेच दुपारी २ वाजता ती करमाळीला दाखल होते. इतर एक्स्प्रेसप्रमाणे या एक्स्प्रेसमध्येही सुरुवातीला मुंबईतून खाद्यपदार्थ लोड केले जात होते. मात्र, नवीन वर्षात त्यामध्ये इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझमने बदल केला आहे. यानुसार, या एक्स्प्रेसमधील सकाळच्या ब्रेकफास्टचा ठेका फूड प्लाझाला तब्बल पाच वर्षांकरिता दिला आहे.ठाण्यात ब्रेकफास्ट, तर रत्नागिरी येथे लंच आणि करमाळीत डीनर गाडीत लोड केले जाऊ लागले आहे. त्यामुळे गाडीत मुंबईऐवजी ठाण्यात तयार होणाºया नाश्त्याची चव चाखता येत आहे. ती आठवड्यातून पाचवेळा या मार्गावर धावते.रेल्वेतील तिकीटधारकांची संख्या निश्चित झाली की, रेल्वे प्रशासनाकडून संबंधित ठेकेदाराला प्रवाशांच्या मागणीनुसार व्हेज आणि नॉनव्हेज असे खाद्यपदार्थ तयार करण्यास सांगितले जाते. त्यानुसार, तयार झालेले ताजे पदार्थ गाडीत रेल्वेस्थानकात दाखल होण्यापूर्वीच आणले जातात.संबंधित कंत्राटदाराकडे पुरेपूर असलेल्या मनुष्यबळामुळे संबंधितांकडून ते खाद्यपदार्थ १२ डब्यांत अवघ्या ३२ सेकंदांत लोड होतात. या नाश्त्याचे प्रवाशांकडून केलेल्या मागणीनुसारच वाटप होते. त्याचबरोबर आॅर्डरपेक्षा २५ ते ३० पाकिटे अतिरिक्त ठेवून गाडीत होणाºया नव्या मागणीनुसार त्याची पूर्तता केली जाते, असे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात येते.>ठाणे स्थानकावरील फूड प्लाझाला पाच वर्षांचा ठेका मिळाला असून तिकीट बुकिंगनंतर रेल्वे प्रशासनाच्या आॅर्डरनुसार ताजे खाद्यपदार्थ तयार करून त्या गाडीच्या प्रत्येक डब्यामध्ये नियोजित वेळेत, म्हणजे अवघ्या ३२ सेकंदांत आॅर्डरप्रमाणे चढवले जात असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
तेजस एक्स्प्रेसमधील चाकरमानी चाखतात ठाण्यातील नाश्त्याची चव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 1:20 AM