मोबाइल चोर गजाआड : डोंबिवलीतील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : चाळीतील घरांना लक्ष्य करून मोबाइल चोरून पसार होणाऱ्या सतीश वाळके (वय २८) या सराईत चोरट्याला विष्णूनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चोरलेला फोन बंद न करता त्यावर कोणी कॉल किंवा व्हिडिओ कॉल केला तर ‘मै हूं डॉन’, असे बोलून तो चॅलेंज देत होता. पोलिसांनाही तो असेच चॅलेंज देत होता. अखेर या स्वत:ला डॉन म्हणविणाऱ्या चोरट्याला पकडण्यात आले.
पश्चिमेतील कोपर भागातील एका चाळीमध्ये काही नागरिकांचे फोन चोरीला गेले होते. याबाबत गुन्हा दाखल होता. विष्णूनगरचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे, पोलीस नाईक बी. के. सांगळे व पथक यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने व गुप्त बातमीमार्फत त्याचा शोध चालू केला.
पोलीस कोठडीत रवानगी
- सांगळे यांचे सतीश सोबत एकदा व्हिडिओ कॉलवर बोलणेही झाले होते. तेव्हाही त्याने ‘मै हूं डॉन, डॉन को पकडना मुमकीन नही नामुमकीन है’, हेच चॅलेंज त्यांना दिले होते. तेव्हा त्याच्या कॉलवरून तांत्रिक बाबीद्वारे शोध घेतला असता तो वाशिम येथे असल्याचे दाखवत होते.
- मात्र, भांडूप येथे तो चोरीच्या उद्देशाने येताच खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार विष्णूनगर पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून सहा हजार रुपये किमतीचा एक मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. त्याला कल्याण जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
------------