- जान्हवी मोर्ये, डोंबिवलीमराठी सारस्वतांचा मेळा अर्थात यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत होत आहे. आपल्या शहरात संमेलन होत असल्याचा अभिमान प्रत्येक डोंबिवलीकराला आहे. सध्या संमेलनाच्या पूर्वतयारीचे वेध लागले आहेत. ही संमेलननगरी येत्या तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने सजत जाईल. ज्या ठिकाणी हे संमेलन होणार आहे, ते क्रीडासंकुल आणि परिसराचा आढावा ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने घेतला असता सोयीपेंक्षा गैरसोयीच नजरेत भरल्या. येत्या तीन महिन्यांत त्या दूर करण्याचे मोठे आव्हान कल्याण-डोंबिवली महापालिका आणि आयोजन समितीपुढे आहे. एमआयडीसीनेही त्यातील आपला वाटा उचलायला हवा. संमेलनाच्या निमित्ताने त्या परिसरात अनेक चांगल्या सुविधा सुरू करता येतील. आजवर मागे पडलेले तेथील विविध प्रकल्प मार्गी लावता येतील. त्यासाठी पालिका, आयोजकांसोबतच सर्वपक्षीय नगरसेवकांनीही पुढाकार घ्यायला हवा. तरच, संमेलन सर्वांच्या स्मरणात राहील. अन्यथा, असुविधांचेच कवित्व रंगेल. साहित्य संमेलनाचा मुख्य भव्य मंडप, ग्रंथ प्रदर्शन उभारले जाईल, क्रीडा संकुलात. ते ज्या जागेवर उभारले जाईल, त्या मैदानाची दुरवस्था नजरेत भरणारी आहे. या मैदानाच्या सपाटीकरणाची चर्चा वारंवार झाली, पण वापरातील मोजका भाग वगळता मैदान उंचसखल आहे. या मैदानाचा वापर खेळासाठी कमी आणि कार्यक्रमांसाठीच अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे मैदानाची वाट लागली आहे. अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने मंडप टाकण्यासाठी खड्डे खणले जातात. ते बुजवण्यासाठी रक्कम आकारली जाते, पण खड्डे वेळच्यावेळी बुजवले जात नसल्याने मैदान कुठूनही सपाट राहिलेले नाही. सध्या पावसामुळे स्वाभाविकच तेथे चिखलाचे साम्राज्य आहे. माजी खासदार प्रकाश परांजपे यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी ती तुटलेली आहे. त्यात जागोजागी कचरा साठला आहे. या गॅलरीचा वापर प्रेमीयुगुलांसाठीच होताना दिसतो. मैदानाशेजारी असलेल्या जॉगिंग ट्रॅकभोवती गवत वाढले आहे. त्यामुळे पावसाळा संपताच मैदानाचे सपाटीकरण, गवत साफ करणे, प्रेक्षक गॅलरीची दुरुस्ती अशी कामे हाती घ्यावी लागतील. क्रीडा संकुलातील उतार, उंचसखलपणा कायमस्वरूपी कमी करता येईल. त्या कामाचे सध्या नियोजन करून ते लागलीच हाती घेतले, तर क्रीडासंकुलातील एक प्रश्न कायमचा निकाली निघेल. या मैदानाभोवतीचे दिवे फुटलेले आहेत आणि घरडा सर्कल ते सावित्रीबाई फुले क्रीडा संकुलाच्या पूर्ण वळणदार रस्त्यावरील दिवे बंद आहेत. त्यामुळे परिसरात नेहमीच काळोखाचे राज्य असते. संकुलाची काही ठिकाणी संरक्षक भिंत तोडण्यात आली आहे, तर काही ठिकाणी तिला भगदाडे आहेत. अंधार असल्याने रात्रीच्या वेळी मैदानात गर्दुल्ल्यांचा वावर असतो. त्यामुळे तो परिसर असुरक्षित बनतो. दिवसाही मैदानात टपोरींचे अड्डे पाहायला मिळतात. या परिसरात बेकायदा पार्किंग आहे. खासकरून बसचे पार्किंग मोठे आहे. त्याच्या आडोशानेही अनेक गैरकृत्ये चालतात. नाट्यगृहाचा शॉर्टकट विस्तारावामैदानाशेजारीच महापालिकेचे ई प्रभाग कार्यालय आहे. मैदानातून सावित्रीबाई फुले नाट्यमंदिराकडे जाणारा मार्ग आहे. तो अरुंद आहे. उंचसखल आहे. त्यामुळेच तो गैरसोयीचा आहे. त्यामुळे त्याचा नियमित वापर होत नाही. संमेलनाच्या काळात क्रीडासंकुल आणि नाट्यगृहातील रसिकांचा वावर वाढेल. त्यासाठी या मार्गाच्या विस्तारीकरणाचे, दुरुस्तीचे कामही हाती घ्यावे लागेल.ना पाणी, ना दिव्यांची सोयडोंबिवली क्रीडा संकुलाला लागूनच शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र बाजपेयी यांच्या नावाचे बंदिस्त क्रीडागृह आहे. त्याची अवस्था बिकट आहे. त्यात दिवे नाहीत. पाण्याची पुरेशी व्यवस्थाही नाही. पाण्याच्या पाच टाक्या आहेत, पण त्या अस्वच्छ आहेत. महिला आणि पुरुषांच्या स्वच्छतागृहाला टाळे आहे. येथील पायऱ्यांवर टोळकी बसलेली असतात. परिसरात अस्वच्छता तर आहेच, पण कचराही साचला आहे. सभागृह बंदिस्त असूनही त्याची अवस्था दयनीय आहे. त्याचा वापर होत नसल्याने दुरवस्था असल्याचे पालिका अधिकारी सांगतात, तर दुरवस्था असल्यानेच त्याचा वापर होत नाही, असे क्रीडापटूंचे म्हणणे आहे.नाट्यगृहात फिरतात उंदीरसावित्रीबाई फुले नाट्यमंदिराचे काही अंशी नूतनीकरण झाले आहे. पण, त्याच्या तळघरात (बेसमेंट) जुने सामान तसेच पडलेले आहे. त्याची स्वच्छता होत नसल्याने उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. हे उंदीर सभागृहात शिरतात.नाट्यप्रयोग सुरू असताना महिला रसिकाच्या पायाचा चावा उंदराने घेतल्याचा प्रसंगही ताजा आहे. या उंदरांमागे मांजरेही फिरतात. त्यामुळे तळघर साफ करणे, नाट्यगृहाचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे. व्हीआयपी रूममधील सोफेही चांगल्या स्थितीत नाहीत. सोफ्यांवर कोणी बसले, तर ती व्यक्ती रुतून राहते. तिला उठवण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. या नाट्यमंदिरात कलावंतांना राहण्यासाठी कोणतीही सोय नाही. मेकअप रूम, स्वच्छतागृहांच्या स्थितीत सुधारणेची गरज आहे.
संमेलनस्थळी गैरसोयी दूर करण्याचे आव्हान!
By admin | Published: September 27, 2016 3:40 AM