ठाणे : कोरोनामुळे क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडल्याने खेळाडूंना याचा मोठा फटका बसला आहे. जुलै-आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या क्रीडा स्पर्धा रद्द झाल्याने या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाºया खेळाडूंचे नुकसान झाले असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे सध्या हा वेळ ते फिटनेसवर खर्च करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.कोरोनाच्या साथीमुळे इतर सर्वच क्षेत्रांसह क्रीडा क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. क्रीडा क्षेत्राचा संबंध उत्तम आरोग्याशी असला, तरी अद्यापही कोरोनावर लस न सापडल्याने क्रीडा क्षेत्रालाही कोरोनाची लागण होण्याची भीती वाटते. सुदृढ आरोग्यासाठी क्रीडा क्षेत्राचे महत्त्व असल्याने तातडीने उपाययोजना न केल्यास भावी क्रीडापटूंवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे क्रीडा प्रशिक्षकांचे म्हणणे आहे. कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी सुटीमध्ये मुलांसाठी आणि युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर शिबिरे घेतली जातात. अनेक स्पर्धांचेही आयोजन केले जाते. या साºया स्पर्धा आणि शिबिरे रद्द करावी लागली आहेत. बॅडमिंटन, बॉक्सिंग, स्केटिंग, बास्केटबॉल, खोखो, कबड्डी, क्रिकेट, जिम्नॅस्टिक्स, टेबलटेनिस, बिलियर्ड्स, अॅथलेटिक्स, तलवारबाजी अशा विविध खेळांच्या शिबिरांचे आयोजन एप्रिल व मे या महिन्यांत राज्यभरात विविध संस्थांमार्फत होते. या माध्यमातून अनेक उदयोन्मुख खेळाडू प्रशिक्षण घेतात. अनेक नवे खेळाडूही तयार होतात. परंतु, यंदा मात्र तसे काहीही होऊ शकलेले नाही. शिवाय, अनेक अनुभवी, हौशी खेळाडूंचा सरावही लॉकडाऊनमुळे बंद झाला आहे. कामगिरीचा आलेख उंचावत ठेवायचा असेल, तर सराव अत्यंत आवश्यक आहे. मात्र, सध्या मैदानावरील सर्व गोष्टी बंद असल्याचा फटका खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर बसू लागला आहे. १४, १७, १९ वयोगटांतील खेळाडूंना याचा सर्वाधिक फटका सोसावा लागतो आहे. भविष्यात कधी क्रीडा स्पर्धा होतील, हे आत्ताच सांगता येत नसले, तरी जेव्हा त्या होतील, तेव्हा सराव नसल्याने कामगिरी खालावण्याची भीती खेळाडूंसह प्रशिक्षकांनी व्यक्त केली. मात्र अशा परिस्थितीतही काही क्रीडा संस्था/संघटनांनी इतर पद्धतींनी काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. उन्हाळी शिबिरे घेऊ शकत नसले, तरी त्यांनी आॅनलाइन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत खेळांची सखोल माहिती देण्यात येते. विशेषत: त्यांचा भर फिटनेसवर असतो.>जी मुले वर्षभर अभ्यास करतात, ती एप्रिल-मे महिन्यांत शिबिरांत सहभाग घेतात. जुलैपासून सुरू होणाºया स्पर्धा रद्द झाल्या. क्रिकेट हा मैदानावरील खेळ असल्याने त्याचे खूप नुकसान झाले आहे. सध्या मुलांना आॅनलाइन फिटनेसचे प्रशिक्षण दिले जात आहे. - दर्शन भोईर, क्रिकेट प्रशिक्षक>कोरोनामुळे स्पर्धा होत नसल्यामुळे, तसेच खेळाडूंचे नेहमीचे प्रशिक्षण बंद असल्यामुळे स्पर्धात्मक खेळले जाणारे खेळ, खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक या सर्वांवरच मोठी संक्रांत आली आहे. एक प्रशिक्षक म्हणून विचार करता खेळाडूंच्या शारीरिक व त्याहीपेक्षा मानसिक फिटनेसवर जास्त लक्ष द्यावे लागत आहे. जे खेळाडू २०२०-२१ या वर्षात त्यांच्या शेवटच्या स्पर्धात्मक वर्षात होते, त्यांना तर खूप मोठ्या अपेक्षाभंगास सामोरे जावे लागत आहे. अशा खेळाडूंशी दररोज अथवा एक दिवसाआड बोलून, त्यांना अनेक नामवंत खेळाडूंच्या गोष्टी सांगून मानसिक संतुलन राखायचा आम्ही प्रयत्न करतो. - समीर सरळकर, टेबल टेनिस प्रशिक्षक
फिटनेस टिकवून ठेवण्याचेच आव्हान मोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 2:05 AM