कल्याण : कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीचा आजार बळावत आहे. या आजारावरील उपचार खर्चिक असून, रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
इंडियन मेडिकल असोशिएशन आणि कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रूममधून म्युकरमायकोसिस या आजारावरील वेबीनार गुरुवारी रात्री आठ वाजता पार पडले. या वेबीनारमध्ये ठाणे, मुंबईतील ४०० तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, इंडियन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील या वेबीनारमध्ये सहभागी झाले होते. यासाठी डॉ. इशा पानसरे, खजिनदार डॉ. सुरेखा इटकर, सहखजिनदार डॉ. राजेश राघवराजू, डॉ. विक्रम जैन, डॉ. श्रेयस गोडबोले, डॉ. अतुल पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली.
स्टेरॉईडचा वापर काळजीपूर्वक करा
म्युकरमायकोसिस रुग्णावर उपचार शस्त्रक्रिया अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीची आहे. कोविड रुग्णाला स्टेरॉईडचा जास्त डोस दिल्यावर म्युकरमायकोसिसचा आजार होतो. कोविड रुग्णांवर आवश्यकता नसल्यास पहिल्या आठवडय़ात स्टेरॉईडचा वापर करू नये. आवश्यकता भासल्यास योग्य प्रमाणात स्टेरॉईड द्यावे. रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी काटेकोरपणे देखरेख ठेवणे आवश्यक आहे. म्युकरमायकोसिस संशयित रुग्णांमध्ये योग्य चाचण्या करणे आवश्यक आहे. याकडे तज्ज्ञ डॉक्टरांनी लक्ष वेधले.
कंट्रोल रूममधून कोविड नियंत्रणाचेच काम
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी कमांड कंट्रोल रूममधून कोविड नियंत्रणाचे काम केले जाईल. या कमांड रूममधून कोविडसंदर्भात सूचना, माहिती दिली जाईल. तसेच डिझास्टर मॅनेजमेंट केले जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.
--------------