डोंबिवली - भाजप आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणानंतर अटक झाल्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व अन्य वरिष्ठ नेत्यांनी गायकवाड अथवा त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन पाठिंबा न दिल्याने कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज असून, बावनकुळे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत आयोजित केलेल्या झूम बैठकीवर कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार घातला.
बावनकुळे यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना ६ एप्रिल हा पक्ष स्थापना दिन, गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती असे सर्व सण - उत्सव साजरे करावेत. बूथ पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी घरोघरी संपर्क साधावा, असे आवाहन केले. बूथ अध्यक्ष कार्यरत नसेल तर वेळीच बदला, त्या जागी काम करणाऱ्यांना संधी द्यावी, असेही सुचवले. मंगळवारी रात्री ९:१५ वाजता बैठक झाली, त्याआधीही २० लोकसभा मतदारसंघात याच पद्धतीने आढावा घेतल्याचे सांगण्यात आले.
भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कामे मिळाली नाहीतकल्याण पूर्वेतील भाजप मंडळ स्तरावरील पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, सध्या इथला पक्ष कार्यकर्ता भरपूर तणावात आहे, त्याच्यावर दडपण आहे. गोळीबाराच्या घडलेल्या घटनेनंतर भाजपच्या कुठल्याही मोठ्या नेत्याने गायकवाड व त्यांच्या कुटुंबाची पाठराखण केली नसल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. गृहखाते भाजपकडे असूनही खाकी वर्दीची भीती वाटत असून, किरकोळ कारणास्तव तासनतास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले जाते. जो काही निधी निवडणुकीपूर्वी आला तो युती धर्माप्रमाणे महायुतीच्या सर्व प्रभागांत वाटला गेला असला तरी कामे मात्र विशिष्ट पक्षाच्या गटाला दिली गेली. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांना काही कामे मिळाली नाहीत.