ठाणे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लुईसवाडी येथे खासगी निवासस्थान असलेल्या शुभदिप बंगल्यात त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि कुटुंबियांची ये- जा असते. त्यामुळे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे त्या परिसरातील सर्व्हिस रोड बंद करून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुढील सात दिवसांसाठी हा बदल असणार आहे.
३१ ऑक्टोबरला मराठा आरक्षणावरून आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने वाहतुकीत बदल केलेला रस्ता आता सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून त्या रस्त्यावरील वाहतुकीत बदल केल्याची अधिसूचना वाहतूक पोलिसांनी काढली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या बंगला या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी बुधवारी सायंकाळी एक अधिसूचना काढली आहे.
त्यामध्ये नितीन ब्रिजखालून प्रजा स्नॅक्स समोरून सर्व्हिस रोडने लॅण्डमार्क सोसायटी, काजुवाडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रजा स्नॅक्स येथे 'प्रवेश बंद' करण्यात आली असून ती वाहने नितिन ब्रिजखालून कामगार नाका कडे जाणाऱ्या रोडने सरळ जावून पुढे अपोलो फार्मसी मेडिकल, रामचंद्रनगर, जिजामाता नगर येथून डावे वळण घेऊन पुढे जाणार आहेत.
तसेच काजुवाडी कट येथून सर्व्हिस रोडने प्रजा स्नॅक्स कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना काजुवाडी कट लॅण्डमार्क सोसायटी कॉर्नर येथे प्रवेश बंद केल्याने ती वाहने काजुवाडी कट येवून उजवे वळण घेऊन हायवे स्लीप रोडने पुढे मार्गक्रमण करील असे म्हटले आहे. ही अधिसूचना ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहील. सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना लागू राहणार नाही.असेही त्यामध्ये नमूद केले आहे.