लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : उपेक्षित जीवनशैली बदलून स्वाभीमानाने जगण्याचे आणि सोबतच शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला हातभार लावण्याचे आवाहन पोलिसांनी मंगळवारी ठाण्यातील तृतियपंथियांना केले. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने मंगळवारी पोलीस मैदानावर तृतियपंथियांसाठी कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने आयोजित या शिबिरासाठी ठाण्यातील तृतियपंथियांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर आणि विधी सेवा प्राधिकरणाचे अॅड. सावंत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सिग्नल्सवर लोकांना पैसे मागणे किंवा अनैतिक व्यवसायात गुंतण्यापेक्षा स्वाभीमानाने जगण्याचे आवाहन दौंडकर यांनी केले. समाजात वावरताना तृतियपंथिय पोलिसांना चांगली मदत करू शकतात. बेकायदेशीर कृत्यांची माहिती देऊन कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासही ते मदत करू शकतात. पोलीस यंत्रणाही तृतियपंथियांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. त्यासाठी कोणत्याही क्षणी आपण स्वत: मदतीसाठी तत्पर असल्याचे दौंडकर यांनी सांगितले. अॅड. सावंत यांनी यावेळी तृतियपंथियांसाठी शासनाच्या असलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. वेगवेगळ्या उद्योगांसाठी शासनातर्फे तृतियपंथियांना प्रशिक्षण दिले जाते. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तामिळनाडूमध्ये एक तृतियपंथिय पोलीस अधिकारी झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जीवनशैली बदलून कायदा, सुव्यवस्थेला हातभार लावा
By admin | Published: May 11, 2017 1:56 AM