ठाणे: ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच पोस्ट कोव्हिड नंतरच्या काळात सकाळच्या वेळेत व्यायाम व मॉर्निंग वॉक प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक बनल्याने सुरक्षितपणे व्यायाम व चालता येण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून ठाण्यात तीन ठिकाणी येत्या १ एप्रिलपासून ''मॉर्निंग वॉक प्लाझा'' शुभारंभ होत आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या तीन ठिकाणावरील वाहतुकीत सकाळच्या वेळेत बदल केला आहे. हा बदल ३० दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर असल्याचे म्हटले असून वाहन चालकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने शरिरात रोग प्रतिकारकशक्ती वाढावी आणि नियमित व्यायाम करावा, या उद्देशाने बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक दररोज सकाळी ५ ते ७ वाजण्याच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. या परिसरातील मॉर्निंग वॉकच्या ठिकाणी अपघात होऊन जिवितहानी होवू नये तसेच या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक सुरळीत सुनिश्चित होण्यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी वाहतुकीमध्ये बदल केला आहे. त्यानुसार वाहतुक शाखेने अधिसूचना काढली आहे.
या ठिकाणी वाहनांना नो-एण्ट्री ; पर्यायी मार्ग शहरातील तीन हात नाकाकडून उजव्या बाजूच्या सर्व्हिस रोडने धर्मवीरनगर नाक्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना तीन हात नाका येथे प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे ती वाहने हरिनिवास मार्गे मार्गक्रमण करतील. तर, धर्मवीरनगर नाका सर्व्हिसरोडने तीन हात नाका कडे जाणाऱ्या वाहनांना धर्मवीरनगर नाका येथे प्रवेश बंद आहे. ही वाहने धर्मवीरनगरनाका येथून पूर्व द्रुतगती महामार्गाने पुढे जातील. तसेच पायलादेवी मंदिर प्रवेशद्वारपासून उपवन अॅम्पीथिएटरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पायलादेवी मंदिर प्रवेशद्वार येथे डावीकडील मार्गिकेत प्रवेश बंद आहे. या वाहनांना पायलादेवी मंदिर प्रवेशद्वार येथून उजव्या मार्गिकेतून अॅम्पीथिएटरकडे जावे लागणार आहे.
याशिवाय कोकणी पाडा, बिरसा मुंडा चौकाकडून हिरानंदानी मेडोज, डॉ. काशिनाथ घाणेकर चौक कडे पवारनगर नवीन रोडच्या डावीकडील एका वाहिनीवरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद केल्याने ती वाहने बिरसा मुंडा चौक येथुन महाराजा अग्रसेन चौककडे जाणाच्या उजव्या मार्गिकेमधुन दुहेरी वाहतुकीने मार्गक्रमण करतील, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.