ठाणे : येथील महानगरपालिका कार्यक्षेत्रात मुंबई मेट्रो लाइन-४ चे माजीवडा ते घोडबंदर रोड, कासारवडवलीपर्यंत काम सुरू आहे. यासाठी कॅडबरी जंक्शन ते कासारवडवली, गायमुख यादरम्यान बॅरिकेडिंग केलेली आहे. यामुळे या रस्त्यावरील ठिकठिकाणच्या वाहतुकीत बदल केले आहेत.
कापूरबावडी, मानपाडा, आनंदनगर, घोडबंदर रोड, कासारवडवली यादरम्यान पिलरवर १२ ते १५ ऑगस्ट या कालावधीत रात्री २३.०० वाजेपासून ते सकाळी ५ वाजेच्या दरम्यान गर्डर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई, ठाणेकडून घोडबंदर रोडने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करून वाहतूक वळवावी लागत आहे. यामुळे परिसरात वाहतूककोंडी होऊ नये यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
यानुसार मुंबई-नाशिक महामार्गाने माजिवाडा, कापूरबावडी ते घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या जड, अवजड व इतर सर्व प्रकारच्या वाहनांना तत्त्वज्ञान विद्यापीठ, कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून मुंबई-नाशिक महामार्गाने माजिवाडा, कापूरबावडी मार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने कापूरबावडी सर्कल येथून उजवे वळण घेऊन बाळकुमनाका, भिवंडी आग्रा रोड, कशेळी, काल्हेर, अंजूर फाटा मार्गे किंवा माजीवाडा उड्डाणपुलाखालून यू टर्न घेऊन खारेगाव ब्रीज, मानकोली नाका मार्गे इच्छित स्थळी जातील. जड, अवजड वाहने वगळून इतर हलकी वाहने तत्त्वज्ञान विद्यापीठ येथून डावीकडे वळण घेऊन सर्व्हिस रोड मार्गे किंवा रवी स्टील, पोखरण रोड नं. २, गांधीनगर, वसंत विहार सर्कल, खेवरा सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.
मुंबईकडून कापूरबावडी जंक्शन तत्त्वज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना माजीवाडा गोल्डन डाइज ब्रीजवर वाय जंक्शन येथे प्रवेश बंद केला आहे. त्यांना पर्यायी मार्ग म्हणून ही नाशिक रोडने खारीगाव टोल नाका, मानकोली नाका मार्गे इच्छित स्थळी जातील. ही वाहतूक अधिसूचना १२ ऑगस्ट रोजी रात्री ते १३ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत आहे. याप्रमाणेच १३ ऑगस्ट रोजी रात्री २३ वा. ते १४ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत. १४ ऑगस्ट रोजी रात्री २३ वा. ते १५ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत राहील. याशिवाय १५ ऑगस्ट रोजी रात्री २३ वा. ते १६ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अमलात राहील. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून वगळले असल्याचे ठाणे शहर वाहतूक शाखा पोलीस उपआयुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.