कल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भावात केडीएमसीने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानदारांना सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या कालावधीतच दुकाने उघडी ठेवावीत, या घातलेल्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भेट घेऊन वेळेत बदल करण्याची मागणी त्यांनी केली होती. यावर सोमवारी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचे सुधारित आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.
अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकानांना सकाळी ७ ते रात्री ७ या कालावधीतच सुरू ठेवण्याच्या मर्यादा घालून दिल्या असताना पोळीभाजी केंद्रे, खाद्यगृहे, बार-रेस्टॉरंट, परमिट रूम, आइस्क्रीम पार्लर, ज्युसची दुकाने यांना मात्र ११ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावात वेळेचे बंधन योग्य आहे; परंतु निर्बंधांच्या वेळेत बदल करून देण्याची मागणी व्यापारीवर्गाने केली होती. महापालिकेने घालून दिलेले पी १ पी २ चे निर्बंध व सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत दुकाने चालू ठेवण्याच्या निर्णयात काहीसा बदल होणे अतिशय आवश्यक असल्याकडे व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले होते. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे सोयीचे व्हावे व व्यापाऱ्यांना आपल्या दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणता यावी, यासाठी महापालिकेने सकाळी ७ ऐवजी सकाळी ९ ते रात्री ९ अशी वेळ ठेवावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. दरम्यान, शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर सोमवारी व्यापाऱ्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचीही भेट घेतली. या चर्चेअंती निर्बंधांच्या वेळेत बदल करण्यात आले असले, तरी पी १ पी २ च्या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
----------------------------------------------------