स्टार १०९६
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : विजेचे युनिट कमी दाखविण्यासाठी वीज मीटरमध्ये फेरफार केला जात असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस येतात. परंतु, वीज मीटरमध्ये फेरफार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. विद्युत कायदा कलम १३५ नुसार कारवाई होऊ शकते. त्यामुळे मीटर जप्तीची कारवाई किंवा मोठा दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे मीटरमध्ये फेरफार करू नयेत, असे आवाहन महावितरणकडून वेळोवेळी केले जाते.
वीज ग्राहकाने त्याचे देयक व दंड ठराविक मुदतीत न भरल्यास त्याच्यावर विद्युत कायद्यातील तरतुदीनुसार पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात येते. या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल होतो. वीज चोरीच्या गुन्ह्यासाठी तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा जबर दंड अथवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे, असेही महावितरण कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
-------------
कल्याण पूर्व, पश्चिम व डोंबिवली विभागांतर्गत केलेली कारवाई...
एप्रिल २०१९ ते मार्च २०२०
९०० ठिकाणी १७ लाख ४२ हजार युनिट विजेची चोरी. त्याची अंदाजे किंमत २ कोटी ४० लाख रुपये.
एप्रिल २०२० ते मार्च २०२१
१६८९ ठिकाणी २३ लाख ८२ हजार युनिट विजेची चोरी. त्याची किंमत ३ कोटी ३० लाख रुपये.
एप्रिल २०२१ ते जुलै २०२१
१०४ ठिकाणी २ लाख ७ हजार युनिट विजेची चोरी. त्याची किंमत ३४ लाख ५० हजार रुपये.
-----------------
अशी होते कारवाई...
- वीज चोरीचा संशय असलेले मीटर ताब्यात घेऊन त्याची महावितरणच्या मीटर टेस्टिंग लॅबमध्ये तपासणी केली जाते. त्यात काही फेरफार केल्याचे आढळल्यास ग्राहकाने जोडलेल्या वीजभारानुसार वीज चोरीचे अनुमानित बिल दिले जाते. तसेच चोरून वीज वापरल्याबद्दल दंड (कम्पाउंडिंग चार्जेस) आकारला जातो.
- वीज चोरीचे अनुमानित बिल व दंडाची रक्कम भरण्यासाठी ग्राहकाला मुदत दिली जाते. तथापि, दिलेल्या मुदतीत ग्राहकाने बिल व दंड न भरल्यास त्याच्यावर विद्युत २००३ मधील तरतुदीनुसार पोलिसांत फिर्याद देण्यात येते. त्यावरून संबंधितांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल होतो. वीज चोरीच्या गुन्ह्यासाठी तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा जबर दंड अथवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.
----------------------
फेरफार करण्याचा प्रयत्न करू नये
- मीटरमध्ये फेरफार करून मीटरची गती कमी करणे, रिमोटद्वारे मीटर बंद करणे, मीटर बायपास करणे, मीटर असतानाही आकडा टाकून वीजचोरी करणे, अशा प्रकारे वीजचोरी केली जाते.
- महावितरण सर्व ग्राहकांच्या मासिक वीज वापराचे नियमित विश्लेषण करीत असते. यात काही ग्राहकांचा वीज वापर कमी असल्याचे आढळल्यास त्या ग्राहकांचा वीज वापर खरोखरच कमी झाला आहे का, की काही फेरफार केला आहे, याची पडताळणी केली जाते. यासाठी मोहीम राबवून वीज चोरांवर धडक कारवाई केली जाते.
------------
वीजचोरी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, या गुन्ह्यात कडक शिक्षेची तरतूद आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा. अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
- विजयसिंह दूधभाते, जनसंपर्क अधिकारी, महावितरण.
-------------