उल्हासनगर : शहरातील दुकानांवर छापा टाकून पैशाची मागणी करणारे पाच बोगस विक्रीकर अधिकारी जेरबंद झाले. व्यापाऱ्यांनी चोप देत त्यांना मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. न्यायालयाने त्यांना २ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शहरातील एका दुकानादाराकडून दोन लाख उकळल्याचे उघड झाले असून, नाशिक येथील दुकानात तपासणी करण्याचे पत्र दिल्याचे पुरावे सापडले आहे.उल्हासनगर कॅम्प नं-३ विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकाच्या बाजूला श्रीचंद नागदेव यांचे कालिका स्टोअर नावाचे दुकान आहे. सोमवारी दुपारी काही व्यक्ती दुकानात आले. त्यांनी विक्रीकर अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखविले. तसेच एक कोरा कागद सही करण्यासाठी पुढे करून हातातील मोबाइल हिसकावला. सही करण्यास नकार देत दुकान तपासण्यास नागदेव यांनी सांगितले. दुकानाची तपासणी नाही तर सील करायचे असल्याचे सांगितल्यावर, नागदेव यांनी नातेवाईक व मित्रांना फोनाफोनी केली. त्यावेळी शेजारील दुकानदार इंदर रोहिडा आल्यावर सर्व प्रकार त्याला सांगितला. या व्यक्ती बोगस अधिकारी असल्याचे रोहिडा यांनी सांगून दोन महिन्यांपूर्वी माझ्याकडून दोन लाख नेल्याचे तो म्हणाला. नागदेव यांचे मित्र व दुकानदार एकत्र आले. त्यांनी अधिकाऱ्यांकडे ओळखपत्राची मागणी केली. ओळखपत्र देण्यास नकार देत पळण्याच्या तयारीत असलेल्या बोगस अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांनी कोंडून चांगलाच चोप दिला. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस, सहायक पोलीस निरीक्षक अनिल भिसे हे घटनास्थळी आले व त्यांनी पाच जणांना अटक केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे बनावट विक्रीकर अधिकाऱ्यांचे ओळखपत्र तसेच नाशिक येथील व्यापाऱ्यांच्या नावाने दुकान तपासण्याची दोन पत्रे मिळाल्याने त्यांचे कनेक्शन नाशिकपर्यंत असल्याचे उघड झाले.रामकृष्ण गुंजाळ (६५), शरदकांत नेरकर (६४), प्रकाश गायकवाड (५०), ब्र्रिजमोहन सराटे (४७), सुनील कोळेकर (३६) अशी अटक केलेल्या बोगस अधिकाऱ्यांची नावे आहेत. यापैकी दोघेजण कल्याण येथील राहणारे असून इतर मुरबाड, विक्रोळी, नेरळ येथील आहेत. दोन महिन्यांपूर्वी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाशेजारील दुकानदार इंदर रोहिडाकडून छापा टाकण्याची भीती दाखवून दोन लाख नेल्याचे उघड झाले. शहरातील अनेकांना त्यांनी चुना लावल्याची चर्चा सुरू असून सहायक पोलीस निरीक्षक अनिल भिसे यांनी व्यापाऱ्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
बोगस विक्रीकर अधिकाऱ्यांना चोप
By admin | Published: April 26, 2017 12:26 AM