ठाणे : कर्ज देण्याच्या नावाखाली लहान व्यापाºयांना गंडा घालणाºया अतुल शर्मा ऊर्फ अनयाल (३०) आणि भरत जोशी (५५, रा. दोघेही वर्तकनगर, ठाणे) या दुकलीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ वागळे इस्टेट पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून असे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.पानटपरीचालकाला या जोडगोळीने ९० हजारांचा गंडा घातल्याचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबर २०१७ रोजी दाखल झाला. त्याचा तपास वर्तकनगर पोलिसांबरोबर गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही सुरू होता. युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, हवालदार देविदास जाधव, नाईक दिलीप शिंदे, राजकुमार पाटील, राजेंद्र गायकवाड यांच्या खबºयाच्या तसेच मोबाइल लोकेशन टॉवरच्या आधारे आधी जोशीला किसननगर भागातून अटक केली. त्यापाठोपाठ अतुल याचीही धरपकड करण्यात आली. दोघांनाही आता सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांनी आतापर्यंत नौपाडा, वर्तकनगर, श्रीनगर या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रांतील २० ते २५ छोट्या दुकानदारांना गाठून त्यांच्याकडून आठ ते १० लाख उकळल्याची माहिती तपासात समोर येत आहे. या दोघांनाही वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
कर्जाच्या नावाखाली छोट्या व्यापा-यांना गंडा ,दोघांना अटक : गुन्हे अन्वेषणची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 2:00 AM