लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाचे संकट लक्षात घेता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून परवानगी आणि फायर एनओसीसाठी शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
आयुक्तांनी गणेशोत्सव मंडळे व अधिकाऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तसेच इमारतींमध्ये बसविल्या जाणाऱ्या गणेश मंडळांनाही फायर एनओसी घेणे आवश्यक असेल, असे आयुक्तांनी बजावले. वाहतूक शाखा, अग्निशमन विभाग, महावितरण कंपनीची तात्पुरती परवानगी व पोलीस स्टेशनच्या एनओसीसाठी पोलीस स्टेशननिहाय प्रभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित केली आहे. परवानगीसाठी ५ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता अर्ज करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
मनपा हद्दीत एकूण ६८ विसर्जन स्थळांवर गणेशमूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था केली आहे. विसर्जन स्थळी व मार्गावर १५२ सीसीटीव्ही कॅमेरे तसेच दोन हजार ४४७ हॅलोजनची व्यवस्था केली आहे. प्रकाश व्यवस्थेसाठी विहित क्षमतेचे ६६ जनरेटर बसविण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘विसर्जन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. पोलिसांच्या मदतीने विसर्जनाचे पूर्ण नियोजन करण्यात येत आहे.
खड्डे बुजविण्याच्या सूचना
- पावसाने उघडीप दिल्यावर विसर्जन मार्गासह सर्व मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाचा आकार सहा बाय आठ फूट इतकाच असावा.
- मागच्या वर्षी गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली होती. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करून सण साजरा करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले.
- उत्सवादरम्यान ज्येष्ठ नागरिकांना आवाजाचा त्रास हाेणार नाही, याची खबरदारी घ्यावी. या ऑनलाइन बैठकीसाठी महापालिका क्षेत्रांतील ९२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हजेरी लावली.
----------------