ठाणे - परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सध्या काँग्रेसचे संजय निरुपम आणि मनसेचे राज ठाकरे यांच्यात सुरु असलेला वाद हा ठरवून केलेला वाद असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. मराठी पाट्या बदलून मराठीपण जपले जाणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी मनसेच्या आंदोलनावर टीका केली आहे.
शनिवारी ते ठाणे महापालिकेत दिव्यांग्याच्या विविध मागण्यांसंदर्भात आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना राज यांच्यावर थेट आरोप केला. यापूर्वी अबू आझमी आणि मनसेमध्ये अशाच प्रकारे ठरवून वाद करण्यात आला होता. यावेळी देखील राज ठाकरे आणिसंजय निरूपम यांच्यामध्ये ठरवून केलेला हा वाद असून जनतेला फसवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे अशा नेत्यांकडे दुर्लक्षच केले पाहिजे असे कडू यांनी सांगितले. ऊस, तूर आणि कापूस यांना योग्य भाव मिळावा म्हणून येत्या ७ डिसेंबर रोजी राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी ठाण्यात केली आहे. भाजप सरकारवर जोरदार टीका करत या सरकारच्या काळात देव सुट्टीवर गेले असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याचेही कडू यांनी सांगितले.मनसे आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर टीका केली केवळ काँग्रेस आणि मनसेवर टीका न करता त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील आपले टीकेचे लक्ष केले. मराठी किंवा अमराठी असा मुद्दा नसून केवळ प्रांतवाद हा राजकीय मुद्दा असल्याचे ते म्हणाले. मुंबईत मोठ्या प्रमाणात युपीमधून आलेले टॅक्सीचालक आहेत. मराठीचा पुळका घेणाऱ्यांनी मराठी माणसासाठी आतापर्यंत काय केले असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. मराठी माणसांसाठी ३० टक्के सवलत देऊन टॅक्सी देण्याची एखादी योजना सरकारी पातळीवर आतापर्यंत का राबवण्यात आली नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला. प्रांतवाद करणे हा केवळ राजकीय स्टंट असल्याचे सांगून त्यांनी राज ठाकरे आणि संजय निरु पम या दोन्ही नेत्यांवर सडकून टीका केली.