ठाणे : ठाण्यातील व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह इतर आरोपींविरूद्ध पोलिसांनी मंगळवारी १६७४ पानांचे आरोपपत्र विशेष मकोका न्यायालयात सादर केले. या आरोपपत्रामध्ये ६७ साक्षीदारांचा समावेश असून, दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या नावावर आरोपी खंडणी वसुली करीत असल्याचे म्हटले आहे.ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सय्यद आणि छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर यांना सप्टेंबर महिन्यात अटक केली. त्यांच्याविरुद्ध जागेच्या वादातून व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा एक गुन्हा कासारवडवली येथे, तर दोन गुन्हे ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. सखोल तपासामध्ये पोलिसांनी जमा केलेले पुरावे आणि जबाबातून संघटित गुन्हेगारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आरोपींविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गतही (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोनपैकी एका गुन्ह्यामध्ये आरोपींनी एका सराफा व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याचा आरोप आहे. ठाणेनगरमध्ये दाखल असलेला हा गुन्हा आणि मकोकाअन्वये खंडणी विरोधी पथकाने विशेष मकोका न्यायालयासमोर आरोपपत्र सादर केले. शम्मी उर्फ पापा अन्सारी आणि गुड्डु या दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. या प्रकरणी पुरवणी आरोपपत्र आवश्यकतेनुसार दाखल केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. ठाणेनगर आणि कासारवडवली येथील दोन गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र सादर करणे अद्याप बाकी आहे.>साक्षीदारांची नावे गुप्तआरोपपत्रामध्ये काही साक्षीदारांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. साक्षीदारांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे. मकोकाच्या कलम १९ अन्वये पोलिसांना तसे विशेषाधिकार असल्याची माहिती तपास अधिकाºयांनी दिली.दोन आरोपींचे कबुलीजबाब : मकोका अंतर्गत आरोपींचे कबुली जबाब नोंदविण्याचा अधिकार पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाºयाला प्राप्त होतो. त्यानुसार खंडणी प्रकरणातील दोन आरोपींचे कबुली जबाब नोंदविण्यात आले आहेत. या दोन्ही आरोपींनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कासकर खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल, दाऊद इब्राहिम, छोटा शकीलचा उल्लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 5:20 AM