ठाणे - सोनसाखळी चोरट्यांमुळे पोलिसांसह सामान्य महिलाही हैराण असताना कापूरबावडी पोलिसांनी भिवंडीच्या पिराणीपाड्यात जाऊन महंमद जमाल सरफराज जाफरी (२१, रा. भिवंडी) याला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सात लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून ठाणे आणि मुंबई परिसरांतील तब्बल २७ गुन्ह्यांची त्याने कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.भिवंडीच्या शांतीनगर भागात जाफरी हा आपल्या साथीदारासह येणार असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे २४ आॅक्टोबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रदीप भानुशाली, सहायक पोलीस निरीक्षक बी.सी. वंजारी आदींच्या पथकाने त्याला साथीदारासह पिराणीपाड्यातील मैदानात दुपारी ४ वा.च्या सुमारास घेरले. त्या वेळी पोलीस पथकावरच चाल करून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात निरीक्षक भानुशाली यांच्या डाव्या हाताला मार लागला, तर हाताचे बोटही फ्रॅक्चर झाले. तरीही, या झटापटीत त्यांच्या पथकाने त्याला पकडले. मात्र, त्याचा अन्य एक साथीदार फैजल इराणी हा मात्र या धुमश्चक्रीत पसार झाला. जाफरी हा ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने बनवलेल्या टॉप २० यादीतील सराईत सोनसाखळी चोरटा आहे. कोपरी, मानपाडा, कासारवडवली, मुलुंड, नवघर, विक्रोळी तसेच कापूरबावडी आदी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील सुमारे २७ सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची त्याने कबुली दिली. यातील नऊ गुन्हे एकट्या कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या परिसरात केल्याची कबुलीही त्याने दिली. त्याच्याकडून आतापर्यंत सात लाखांचे २४ तोळे सोने हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला ३० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निरीक्षक बारावकर यांनी वर्तवली आहे. पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे हे अधिक तपास करीत आहेत.
पाठलाग करून ठाणे पोलिसांनी सोनसाखळी चोरट्याला पकडले, सात लाखांचे सोने हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 10:42 PM