ठाणे : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, प्रभाग क्र. ५ चे अपक्ष उमेदवार सुधाकर चव्हाण यांच्या समर्थकाची सोमवारी नाट्यमय घरवापसी झाली. सेना नेत्यांनी दिशाभूल करून त्याचा प्रवेश करून घेतला होता, असा आरोप चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. चव्हाण यांचे समर्थक गणेश टाक यांनी पत्रकारांसमोर सगळा प्रकार कथन केला. सोमवारी सेनेचे अनिल दुधाणे आणि रत्नाकर शेट्टी यांनी चर्चेसाठी सोबत नेले. त्यांनी सेनेच्या स्थानिक दिग्गज नेत्यांसमोर उभे केले. यामुळे मी क्षणभर गोंधळलो. माझ्या खांद्यावर भगवा दुपट्टा टाकून लगेच फोटोही काढले. यामुळे आपले मन व्यथित झाले. घरी परतल्यानंतर चव्हाण यांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पोलिसांनी नोंदवला टाक यांचा जबाबचव्हाण यांच्या शिवाईनगरातील निवासस्थानी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता. पत्रकार परिषद आटोपताच चव्हाण यांनी टाक यांना सोबत घेऊन वर्तकनगर पोलीस ठाणे गाठले. टाक यांच्यावर कुणाचा दबाव आहे का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला. जबाब नोंदवण्याची ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यासंदर्भात कुणाचीही तक्रार अद्याप तरी नसल्याचे वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गावित यांनी सांगितले.
चव्हाण समर्थकाची नाट्यमय ‘घरवापसी’
By admin | Published: February 14, 2017 2:55 AM