पालघर : नेव्ही, आर्मी मधील सेवानिवृत्त कर्मचारी, रिक्षाचालक, फेरीवाले इ. नी आयुष्यभर मेहनत करून जमवलेल्या रक्कमेतून आगाशी, विरार येथील आमोनिक इको सिटी व क्रिस्टल होमीयोकॉन प्रायव्हेट लिमिटेड या रहिवासी गृहसंकुलामध्ये घरासाठी ४ ते ५ लाख रूपये गुंतवले. परंतु चार वर्षापासून घरे न देता तिसऱ्याच पार्टीला सर्व मालमत्ता विकून प्रकल्पाचे मालक व व्यवस्थापक पसार झाले आहेत. या सर्वांविरोधात पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करूनही त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जात नसल्याच्या निषेधार्थ फ्लॅट ग्राहकांनी पालघर रेल्वे स्टेशन ते पोलीस अधिक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा आयोजित केला होता.विरार येथील आगाशी रोडवरील जे. पी. नगर येथे आमोनीया इको सिटी या रहिवाशी संकुलाच्या प्रकल्पाच्या मोठमोठ्या जाहीराती आकर्षकरित्या झळकू लागल्याने व चांगल्या परवडणाऱ्या भावात फ्लॅट मिळणार असल्याने सिव्हील आॅफीसर, नेव्ही, आर्मी कर्मचारी, रिक्षावाले, फेरीवाले, कामगार इ. सुमारे १४०० ते १५०० ग्राहकांनी प्रत्येकी सुमारे ४ ते ५ लाख रूपये गुंतवणूक केली. या प्रकरणातील तारीक शौकत चुनेवाला, मो. आजम अब्दुल अजीज खान, विश्राम सावंत, प्रसाद बागवे, प्रमोद सावंत, संगीता नरेंद्र अग्रवाल, जयेंद्र कमळाकर पाटील, प्रतीक मुकेश जैन इ. फसवणूक करणाऱ्या विरोधात मुख्यमंत्री, पालघर पोलीस अधिक्षकाकडे सहा महिन्यापासून तक्रार करूनही आरोपी विरोधात कुठलीही कारवाई केली जात नाही. सरळ सरळ आमची आयुष्यभराची कमाई लुबाडली जात असताना प्रशासन करते तरी काय? असा उद्वेगपूर्ण प्रश्न उपस्थित केला.शनिवारी सकाळी ११ वाजता शेकडो रहिवाशांनी पालघर स्टेशन ते पोलीस अधिक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा आयोजित केला होता. जोपर्यंत सक्षम अधिकारी खाली उतरून आमच्याशी चर्चा करीत संबंधीत आरोपी विरोधात गुन्हे दाखल करून त्याला अटक करीत नाही. तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही असे सांगून त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर भर उन्हात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. (वार्ताहर) > दीड ते दोन वर्षात घरे दिली जातील इ. विविध प्रलोभने देऊन हजारो लोकांनी गुंतवणूक (सुमारे ७० कोटी) केल्यानंतर घरे देण्यास टाळाटाळ होऊ लागली. त्यानंतर आमोनीक इको सिटी व्यवस्थापकाने आपला प्रकल्प परस्पर क्रिस्टल होमीयोकॉन प्रा. लि. यांना विकून टाकला. त्यामुळे आता तुम्हाला घरे हवी असतील तर वाढीव रक्कम भरावी लागते असे सांगितल्याने शेवटी नाईलाजाने आम्ही वाढीव रक्कमही भरल्याचे प्लॅटधारक रोबीत जिंदल यांनी सांगितले. मात्र त्या नंतर पुन्हा सर्व गुंतवणूकदारांची फसवणूक करून क्रिस्टल होमीयोकॉन या व्यवस्थापकाने हा प्रकल्प तिसऱ्याच पार्टीला परस्पर विकून टाकला. त्यामुळे आयुष्याची कमाई या घरामध्ये गुंतवणूक केली असताना आमची मोठी फसवणूक केली जात असल्याची परिस्थिती त्यांनी लोकमत पुढे मांडली.
स्वस्त घरांच्या आमिषाने हजारोंना चुना
By admin | Published: March 22, 2016 2:05 AM